भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. पहिल्या डावात भारतीय संघाला ३५८ धावांवर रोखल्यावर इंग्लंडच्या संघाने ६६९ धावा करत ३११ धावांची आघाडी घेतली होती.
३०० पारची आघाडी भेदताना टीम इंडियातील चौघांनी सर्वोत्तम खेळ दाखवत भारताच्या धावफलकावर ४०० पार धावसंख्या लावत यजमान इंग्लंड संघाचे चौथा कसोटी सामना जिंकून मालिका जिंकण्याचे मनसुबे उधळून लावलेच. टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच संघातील चार फलंदाजांनी एका मालिकेत ४०० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला आहे.
इंग्लंडच्या मैदानातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार शुबमन गिल सर्वात आघाडीवर आहे. त्याने पहिल्या चार कसोटी सामन्यात चार शतकांसच्या मदतीने आतापर्यंत या मालिकेत ७२२ धावा केल्या आहेत.
लोकेश राहुल या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने ६३.९ च्या सरासरीसह चार कसोटी सामन्यातील ८ डावात ५११ धावा केल्या आहेत.
विकेट किपर बॅटर रिषभ पंत याने ४ कसोटी सामन्यातील ७ डावात ६८.४ च्या सरासरीसह ४७९ धावा केल्या आहेत. उजव्या पायाच्या दुखापतीमुळे तो मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्याला मुकणार आहे.
पहिल्या ३ कसोटी सामन्यात सलग ४ अर्धशतके झळकवणाऱ्या रवींद्र जडेजाने चौथ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी साकारली. यासह ४ सामन्यात १०२.५ च्या सरासरीसह त्याच्या खात्यात ४१० धावा जमा झाल्या आहेत.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये फक्त एकमेव इंग्लिश बॅटरचा समावेश आहे.
इंग्लंडचा विकेट किपर बॅटर जेमी स्मिथ याने ४ कसोटी सामन्यात ८४.८ च्या सरासरीसह ४२४ धावा काढल्या आहेत.