Join us

पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:32 IST

Open in App
1 / 5

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्सवर सुरू असलेला तिसरा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. आता खेळाच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी १३५ धावांची आवश्यकता आहे. तर इंग्लंडला ६ बळींची आवश्यकता आहे. दोन्ही संघांचा पहिला डाव हा ३८७ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १९२ धावा काढत भारतासमोर विजयासाठी १९३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाटी अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. चौथ्या दिवस अखेर के.एल. राहुल ३३ धावांवर खेळत होता.

2 / 5

या सामन्याची सध्याची स्थिती पाहता ही लढत सध्यातरी बरोबरीत आहे. मात्र सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघासाठी विजय मिळवणं सोपं नसेल. नवा चेंडू सध्यातरी केवळ १७.४ षटके जुना आहे. तसेच पाचव्या दिवशी या चेंडूपासून गोलंदाजी करणाऱ्या संघाला मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यातच भारताचे चार फलंदाज बाद झाले आहेत. त्यामुळे १३५ धावांच्या आव्हानाचटा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीची कसोटी लागणार आहे. जर या सामन्यात भारताने विजय मिळवला, तर या मालिकेत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळणार आहे. मात्र आज खेळाच्या पाचव्या दिवशी ३ गोष्टी निर्णायक ठरणार आहेत. त्याचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे.

3 / 5

लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी खेळाचा पहिला तास हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच या ६० मिनिटांच्या खेळामधून सामन्याची पुढील दिशा निश्चित होईल. जर खेळाच्या पहिल्या तासात भारतीय संघाने विकेट गमावले नाही तर भारतासाठी विजयाचा मार्ग सुकर होईल. तर पहिल्याच तासात इंग्लंडने दोन-तीन बळी टिपले तर यजमान इंग्लंडचं सामन्यातील पारडं जड होईल. त्यातच खेळाच्या पाचव्या दिवशी खेळपट्टीवरूनही गोलंदाजांना साथ मिळण्याची शक्यता असल्याने भारतीय फलंदाजांना विजय मिळवण्यासाठी मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागू शकते.

4 / 5

भारतीय संघाने १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एका बाजूने चार फलंदाज बाद झाले तरी सलामीवीर लोकेश राहुल एक बाजू लावून धरली आहे. लोकेश राहुल ३३ धावांवर नाबाद खेळत आहे. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी लोकेश राहुलने जबाबदारीने फलंदाजी करत एक बाजू लावून धरली तर भारतीय संघ विजयासमीप पोहोचू शकतो. तसेच रिषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी लोकेश राहुलला चांगली साथ दिल्यास भारताला विजयी लक्ष्य गाठणे सोपे जाईल.

5 / 5

या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडची गोलंदाजी तितकीशी प्रभावी ठरली नव्हती. मात्र लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी अत्यंत भेदक गोलंदाजी करत भारताचा डाव अडचणीत आणला होता. त्यामुळे भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी समोर माफक आव्हान असलं तरी ब्रायडन कार्स, बेन स्टोक्स, ख्रिस व्होक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्या गोलंदाजीचा सामना करताना भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ