'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

Rohit Sharma, IND vs BAN Asia Cup : अवघ्या २० दिवसांत World Cup; रोहित कधी शोधणार या प्रश्नांची उत्तरे?

Asia Cup 2023 IND vs BAN : भारत आशिया चषक 2023 मधील शेवटचा सुपर 4 सामना बांगलादेश विरुद्ध 6 धावांनी हरला. स्टार खेळाडूंनी भरलेल्या भारतीय फलंदाजीला २६६ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. भारताचा संघ सलग दुसऱ्या सामन्यात ऑलआऊट झाला. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले होते. भारत आधीच फायनलमध्ये गेल्याने बेंचवर बसलेल्या खेळाडूंना रोहितने संघात स्थान दिले होते. पण या पराभवानंतर आता रोहितसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अवघ्या २० दिवसांवर वर्ल्ड कप स्पर्धा आलेली असताना रोहित आणि टीम इंडियासमोर पुढील प्रश्न उभे ठाकले आहेत.

सूर्यकुमार यादव हा टी-२० मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे पण वनडेमध्ये गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. 25 डावांनंतर त्याची सरासरी केवळ 24.40 आहे. तरीही त्याची विश्वचषक संघात निवड झाली आहे. चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशविरुद्ध तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. कारकिर्दीतील पहिल्या 6 डावात त्याची सरासरी 65 होती पण त्यानंतर तो कधीही 40 धावा करू शकला नाही.

रवींद्र जडेजाचा बॅटिंग फॉर्म टीम इंडियासाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो पण त्याने शेवटचे अर्धशतक 2020 मध्येच झळकावले. आशिया कपमध्ये तो सपशेल अपयशी ठरला असून विश्वचषकापूर्वी त्याचा फॉर्म संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

रवींद्र जाडेजा गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे, पण फलंदाजीत चांगली कामगिरी करत नाही. अक्षर फलंदाजीत धावा काढत असला तरी गोलंदाजीत त्याला छाप सोडता येत नाहीये. गेल्या ५ वनडेत त्याच्या नावावर फक्त ३ विकेट्स आहेत. त्याला एकदाही त्याची १० षटकांची स्पेल पूर्ण करता आलेली नाही. अक्षर जवळपास 6 च्या इकॉनॉमीने धावा देत आहे. ही चिंतेची बाब आहे.

बांगलादेशच्या 8, 9 आणि 10 क्रमांकाच्या फलंदाजांनी मिळून 87 धावा केल्या. 193 धावांवर 7 गडी बाद झाल्यानंतर संघाने 265 धावा केल्या. गेल्या सामन्यातही श्रीलंकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले होते. त्यामुळे टेल-एंडर्सना लवकरात लवकर कसे रोखायचे हा भारतीय गोलंदाजांसमोरचा प्रश्न आहे.

फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाज खूप मजबूत मानले जातात. पण श्रीलंकेविरुद्धच्या सर्व 10 विकेट्स फिरकीपटूंनी घेतल्या. बांगलादेशच्या चार फिरकीपटूंनी फलंदाजांना खूप त्रास दिला. शेवटच्या षटकातही बांगलादेशी संघ फिरकीपटूंच्या साथीने गोलंदाजी करत होता. त्यांच्याविरुद्ध कोणताही भारतीय फलंदाज उघडपणे खेळू शकला नाही. भारतीय फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध का झगडत आहेत, हे कोणालाच समजत नाही. याचेही उत्तर रोहित आणि संघ व्यवस्थापनाला शोधावे लागणार आहे.