भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून 2-0 ने मालिकेवर कब्जा केला आहे. आज अखेरच्या दिवशी यजमान बांगलादेशच्या संघाने शानदार पुनरागमन करून भारताची धाकधुक वाढवली होती. मात्र, रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार खेळी करून यजमानांना पराभवाची धूळ चारली.
आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी यजमान बांगलादेशच्या संघाने शानदार पुनरागमन करून भारतावर दबाव टाकला. मात्र, अश्विन-अय्यरच्या जोडीने डाव सावरला आणि भारताला विजय मिळवून दिला. अश्विनचा सामनावीर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
श्रेयस अय्यर (29) आणि रविचंद्रन अश्विन (42) यांनी नाबाद खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा करून सामन्यात 87 धावांची आघाडी घेतली होती. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे संघ मजबूत स्थितीत होता.
बांगलादेशची फलंदाजी दुसऱ्या डावात देखील अयशस्वी ठरली. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून यजमानांना केवळ 231 धावांवर रोखले. खरं तर भारतासमोर विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य होते. भारतीय संघ सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा होती पण, महेदी हसनने 5 बळी पटकावून बांगलादेशच्या चाहत्यांना जागे केले.
लक्षणीय बाब म्हणजे आपल्या दुसऱ्या डावात भारताची फलंदाजी पूर्णपणे अयशस्वी ठरली. लोकेश राहुल (2), शुबमन गिल (7), चेतेश्वर पुजारा (6), अक्षर पटेल (34), विराट कोहली (1), जयदेव उनाडकड (13) आणि रिषभ पंत (9) धावा करू माघारी परतला.
रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा हिरो ठरला. त्याने पहिल्या डावात 4 बळी पटकावले, तर दुसऱ्या डावात अश्विनला २ बळी घेण्यात यश आले.
अखेरच्या दिवशी भारतीय संघ विजयासाठी संघर्ष करत असताना अश्विनने फलंदाजीतून देखील शानदार कामगिरी केली. अश्विनने भारताकडून सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. अश्विनच्या या शानदार खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, 'आर अश्विन कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू म्हणून सोनं आहे.' सूर्यकुमार यादवने देखील अश्विनच्या खेळीचे कौतुक केले. याशिवाय सचिन तेंडुलकरने देखील अश्विन आणि अय्यर यांच्या खेळीचे कौतुक केले.
'दबावाखाली असताना देखील @ashwinravi99 आणि @ShreyasIyer15 यांनी आपला क्लास दाखवला', अशा आशयाचे सूर्याने ट्विट केले. बांगलादेशविरूद्धच्या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC 2023) फायनलकडे कूच केली आहे.
खरं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्त्वाची होती. या मालिकेपूर्वी 55.77 गुणांसह भारत WTC पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आजच्या विजयामुळे भारताने 58.93 गुण मिळवले असून आपले दुसरे स्थान मजबूत केले आहे.
आजच्या विजयाने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. आता भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले तर त्यांचे गुण 62.5 होतील आणि टीम इंडिया सहजपणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.