ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवत टी-२० विश्वचषकासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. या मालिकेत भारतीय संघातील काही खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. दरम्यान, आता टी-२० विश्वचषकातही हे खेळाडू टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत अक्षर पटेलने प्रत्येक सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्याने या मालिकेत एकूण ८ विकेट्स टिपल्या. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
विराट कोहली त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात केलेली अर्धशतकी खेळी संघाच्या विजयात निर्णायक ठरली होती. विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर तो भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण फलंदाज ठरेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये कमाल दाखवली होती. त्याने पहिल्या सामन्यात ७१ धावांची खेळी केली. तर तिसऱ्या सामन्यात नाबाद २५ धावा काढताना विजयी चौकार ठोकला होता. त्यामुळे विश्वचषकासाठी त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
पहिल्या सामन्यात अर्धशतक फटकावणाऱ्या लोकेश राहुलला पुढच्या सामन्यांमध्ये कमाल दाखवता आली नाही. मात्र त्याची क्लासिक फलंदाजी विश्वचषकामध्ये भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून भारतीय संघाला मधल्या फळीत विश्वासू फलंदाज मिळालेला नाही. सूर्यकुमार यादवने गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत ही उणीव भरून काढली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने धमाकेदार ६९ धावांची खेळी केली होती.