Join us

IND vs AUS 3rd ODI: "नेमकी तिथेच आम्ही माती खाल्ली..."; Rohit Sharma ने सांगितलं पराभवाचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 23:27 IST

Open in App
1 / 6

Rohit Sharma, Team India, IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज झालेल्या शेवटच्या सामन्यात भारताला पराभूत करून वन डे मालिका २-१ ने जिंकली. २०१९ पासून भारतात येऊन सतत वन-डे किंवा टी-२० मालिका जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ ठरला.

2 / 6

ऑस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांना रडवलं. सलामीवीर मिचेल मार्शच्या ४७ आणि विकेटकीपर अलेक्स कॅरीच्या ३८ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने हळूहळू का होईना, २६९ धावापर्यंत मजल मारली. कुलदीप-हार्दिकने ३-३ विकेट्स घेतल्या पण त्याचा फारसा फायदा झाला नाही.

3 / 6

भारत २७० धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामना फिरवला. अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी आणि अप्रतिम फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी भारताला सामना आणि मालिका पराभवाचं पाणी पाजलं. या सामन्यानंतर बोलताना, रोहितने नक्की कुठे चूक झाली याबद्दल स्पष्टपणे कबुली दिली.

4 / 6

'आम्ही साऱ्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले. पण तरीही आमच्याकडून तसं घडलं नाही. जानेवारीपासून आम्ही एकूण ९ वन डे सामने खेळलेत, त्यामुळे आम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळालं आहे. पण आजच्या विजयाचं श्रेय ऑस्ट्रेलियाला दिलंच पाहिजे,' अशा शब्दांत रोहितने प्रतिस्पर्ध्यांचे खुलेपणाने कौतुक केले.

5 / 6

'आमचे फलंदाज ज्या पद्धतीने बाद झाले ती गोष्ट खटकणारी होती. आम्ही याच पिचवर खेळत लहानाचे मोठे झालोय. त्यामुळे काही वेळा फलंदाजांनी स्वत:ची प्रतिभा वापरून खेळात बदल करायला हवा. एका फलंदाजाने संयम ठेवून सामना शेवटपर्यंत खेचायला हवा होता, पण ते आम्हाला जमलं नाही,' याकडे रोहितने लक्ष वेधले.

6 / 6

'मला अजिबात वाटत नाही की आजचं आव्हान मोठं होतं. या धावा नक्कीच होऊ शकल्या असत्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करणं काहीसं आव्हानात्मक होतं हे मान्य आहे. पण तरीही मला असं वाटतं की आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. अशा सामन्यांमध्ये पार्टनरशीप म्हणजेच भागीदारी महत्त्वाची असते आणि आम्ही तिथेच माती खाल्ली,' असं रोहितने कबूल केले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया
Open in App