ICC WTC India vs England Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या न्यूझीलंडवर ३-० असा विजय मिळवला. या पराभवामुळे किवींचा WTCच्या फायनलमध्ये जाण्याचा मार्ग अवघड बनला आहे. पण, गत उपविजेत्या टीम इंडियाला अजूनही संधी आहे.
त्यादृष्टीने India vs England पाचव्या कसोटी महत्त्वाची आहे. भारतीय संघ ७७ गुणांसह व ५८.३३ टक्क्यांसह World Test Championship Points Table मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतील विजय हा भारताच्या अंतिम फेरीत जाण्याच्या आशा उंचावणारा ठरणार आहे.
ही लढत ड्रॉ राहिली तरी टीम इंडियाच्या फायद्याची ठरेल. यानंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे आणि ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिकेसाठी भारतात येणार आहे. WTC गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला खाली खेचण्याची ही टीम इंडियासाठी योग्य संधी आहे.
पाचव्या कसोटीत विजय मिळवल्यास भारताचे गुणही वाढतील अन् टक्केवारीही सुधारेल. त्यानंतर भारताला बांगलादेशविरुद्ध दोन व ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर कदाचित टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.
बांगलादेशविरुद्धचा विजयासोबतच जर भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० किंवा ३-१ असे नमवून मालिका जिंकली, तर ते अव्वल दोन स्थानावर पोहोचतील आणि त्यांचे अंतिम सामना खेळण्याचे चान्स वाढतील. भारताच्या या निकालामुळे इंग्लंड व न्यूझीलंड यांच्या स्वप्नांचा मात्र चुराडा होईल.
पण, सध्याच्या घडीला इंग्लंडचा संघ मजबूत दिसतोय आणि त्यांनी न्यूझीलंडवर ३-० असा विजय मिळवला आहे. इथे भारत हरला तर पुढील समिकरणही बिघडले.