ICC T20 World Cup 2026 : 'या' ३ संघांनी २ वेळा उंचावली ट्रॉफी! टीम इंडियाला दुहेरी विक्रमाची संधी

सर्वाधिक वेळा टी २० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारे संघ कोणते? जाणून घ्या आतापर्यंतच्या विजेत्यांची संपूर्ण यादी

पुरुष टी-२० वर्ल्ड कप २००७ स्पर्धेतील पहिला वहिला हंगाम दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात पार पडला. या हंगामातील फायनलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने रंगतदार सामन्यात पाकिस्तानला ५ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले होते. भारताकडून इरफान पठाण हिरो ठरला. तर पाकिस्तानचा मिस्बाह उल हक स्कूप शॉटमुळे खलनायक ठरला.

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप २००९ च्या हंगामात युनूस खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने बाजी मारली. फायनलमध्ये त्यांनी श्रीलंकेविरुद्ध ८ विकेट्सनी विजय नोंदवत ही स्पर्धा जिंकली होती. शाहिद आफ्रिदीनं फायनलमध्ये नाबाद ५४ धावांसह १ विकेट घेत संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

२०१० मध्ये वेस्ट इंडिजच्या मैदानात पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या तिसऱ्या हंगामात इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला ७ विकेट्सने पराभूत करत स्पर्धा गाजवली. पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवून देण्यात क्रेग कीस्वेटर याने नाबाद ६३ धावांच्या खेळीसह संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

श्रीलंकेत झालेल्या २०१२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथ्या हंगामात डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या संघाने यजमान श्रीलंकेला ३६ धावांनी पराभूत करत जेतेपद पटकावले होते. कॅरेबियन संघाला पहिला वहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकून देण्यात मार्लन सॅम्युअल्स याने ७८ धावांच्या खेळीसह महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

२०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा बांगलादेशमध्ये पार पडली. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने फायनलमध्ये भारतीय संघाला ६ विकेट्सने पराभूत करत जेतेपद पटकावले होते. कुमार संगकाराने नाबाद ५२ धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

भारतीय मैदानात खेळवण्यात आलेल्या २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजच्या संघाने इंग्लंडला पराभूत करत दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावत इतिहास रचला होता. कार्लोस ब्रेथवेट याने फायनलमध्ये अखेरच्या षटकात सलग चार षटकार मारुन संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

युएई आणि ओमान यांच्या यजमानपदाखाली रंगलेल्या २०२१ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अ‍ॅरॉन फिंच याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली. फायनलमध्ये मिचेल मार्शच्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर कांगारूंच्या संघाने न्यूझीलंडला ८ विकेट्सनी पराभूत केले होते.

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या हंगामात पाकिस्तानला ५ विकेट्सनी पराभूत करत ट्रॉफी उंचावली होती. अंतिम सामन्यात बेन स्टोक्स नाबाद ५२ धावांच्या खेळीसह हिरो ठरला होता.

२०२४ मध्ये वेस्ट इंडिज / अमेरिका यांच्या यजमानपदाखाली झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर नाव कोरले होते. फायनलमध्ये किंग कोहलीच्या ७६ धावांच्या खेळीसह बुमराह आणि हार्दिक पांड्याशिवाय सूर्याचा कॅच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला होता.

टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यत एकाही संघाने जेतेपदाचा बचाव केलेला नाही. एवढेच नव्हे तर घरच्या मैदानात कुणीही ट्रॉफी उंचावलेली नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाकडे हा पराक्रम करून नवा इतिहास रचण्याची संधी आहे.