Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC चा ‘तो’ मास्टरस्ट्रोक आणि पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास झाला तयार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:44 IST

Open in App
1 / 7

सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित असलेल्या सामन्याबाबतची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. तसेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आहे. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या पाकिस्तानने अचानक माघार कशी काय घेतली याचीच चर्चा आता क्रिकेट विश्वात रंगली आहे. या दरम्यान, नेमकं काय घडलं आणि पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध खेळण्यासाठी कसा काय तयार झाला, पडद्यामागे काय घडामोडी घडल्या याचा घेतलेला हा आढावा.

2 / 7

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बांगलादेशच्या संघापासून झाली होती. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही बांगलादेशची बाजू घेत या वादात उडी घेतली. मात्र आयसीसीने बांगलादेशच्या दाव्यांना केराची टोपली दाखवत बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरची वाट दाखवली. त्यानंतर पाकिस्तानने आणखी एक चाल खेळली. तसेच आपण विश्वचषक स्पर्धेत खेळू मात्र बांगलादेशला पाठिंबा म्हणून भारताविरुद्ध खेळणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच बांगलादेशला या स्पर्धेसाठीचा पूर्ण निधी मिळावा, द्विपक्षीय मालिका व्हाव्यात यासह अनेक मागण्या केल्या. दरम्यान, पाकिस्तान सरकारनेही अधिकृतपणे या सामन्यातून माघार घेण्याचे जाहीर करून टाकले होते.

3 / 7

मात्र आयसीसीने पाकिस्तानने केलेल्या मागण्या धुडकावून लावल्या. द्विपक्षीय मालिका, तिरंगी स्पर्धा आणि भारताचा बांगलादेश दौरा या बाबी आपल्या अखत्यारित येत नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. मात्र स्पर्धेतून माघार घेणाऱ्या बांगलादेशवर आयसीसीने कुठलीही दंडात्मक कारवाई केली नाही. तसेच बांगलादेशला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद देण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगितले. मात्र पाकिस्तानच्या उर्वरित ३ मागण्या आयसीसीने धुडकावून लावल्या. तसेच सरकारसोबत बोलून भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.

4 / 7

त्यानंतर पाकिस्तान सरकारनेही बहुपक्षीय चर्चा आणि मित्र देशांनी केलेल्या विनंतीचा मान राखून पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची परवानगी देत असल्याचे जाहीर केले. तसेच हा निर्णय क्रिकेटमधील खेळभावना जपण्यासाठी घेत असल्याचेही पाकिस्तान सरकारने सांगितले.

5 / 7

दरम्यान, पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी तयार होण्यामागची काही प्रमुख कारणेही समोर येत आहेत. त्यामध्ये पाकिस्तानला या लढतीत न खेळल्यास दंडात्मक कारवाई होईल, अशी भीती सतावत होती. तसेच महत्त्वाच्या सामन्यातून माघार घेतल्यास क्रिकेट जगतात वेगळे पडण्याची चिंताही पाकिस्तानला सतावत होती. याशिवाय जर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध खेळला नसता तर त्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालं असतं, तसेच विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत न खेळल्याने त्यांची प्रतिमा आणखीनच खराब झाली असती.

6 / 7

आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे पाकिस्तानने भारताविरुद्ध न खेळण्यासाठी बांगलादेश, श्रीलंका आणि यूएई या देशांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला त्याच्याच चालीमध्ये गुंतवून डाव उलटवला. आयसीसीने यासाठी पाकिस्तान ज्या तीन देशांच्या पाठिंब्याचा दावा करत होता. त्या श्रीलंका, बांगलादेश आणि यूएईला सोबत घेतले.

7 / 7

सुरुवातीला या स्पर्धेचे सहयजमान असलेल्या श्रीलंकेला हा सामना न झाल्यास आर्थिक नुकसान होणार असल्याची बाब आयसीसीने पटवून दिली. त्यानंतर खुद्द श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसनायके यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फोन करून स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्याचं आवाहन केलं. त्यानंतर यूएईनेही या सामन्यात खेळण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला. अखेरीस ज्या बांगलादेशसाठी सगळा आटापिटा करत असल्याचं नाटक पाकिस्तान करत होता, त्या बांगलादेशनेही क्रिकेटच्या व्यापक हितासाठी पाकिस्तानने या सामन्यात खेळावं असं आवाहन केलं. त्यानंतर पाकिस्तानकडे भारताविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेण्यावाचून कुठलाही पर्याय उरला नाही.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६आयसीसीभारत विरुद्ध पाकिस्तानटी-20 क्रिकेट