डेव्हिड वॉर्नर-मिचेल मार्श यांच्याकडून पाकिस्तानची निर्दयी धुलाई! ०९ मोठ्या विक्रमांचा वर्षाव

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी आज पाकिस्तानच्या गोलंदाजांची निर्दयी धुलाई केली. या दोघांनी वैयक्तिक शतकांसह ०९ मोठ्या विक्रमांचा वर्षाव केला.

वन डे क्रिकेटमध्ये वाढदिवसाला शतक झळकावणारा मिचेल मार्श हा सहावा फलंदाज ठरला. टॉम लॅथम ( १४०* वि. नेदरलँड्स, २०२२), सचिन तेंडुलकर ( १३४ वि. ऑस्ट्रेलिया, १९९८), रॉस टेलर ( १३१* वि. पाकिस्तान, २०११), सनथ जयसूर्या ( १३० वि. बांगलादेश, २००८), विनोद कांबळी ( १००* वि. इंग्लंड, १९९३) यांनी असा पराक्रम केलाय. पण, वर्ल्ड कप स्पर्धेत टेलर नंतर वाढदिवशी शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दोन्ही सलामीवीरांनी शतक झळकावण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान व उपुल थरंगा यांनी अनुक्रमे झिम्बाब्वे व कॅनडा या संघांविरुद्ध २०११ मध्ये, भारताच्या लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी श्रीलंकेविरुद्ध २०१९मध्ये असा पराक्रम केला होता.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील डेव्हिड वॉर्नरचे हे पाचवे शतक ठरले. त्याने रिकी पाँटिंगशी ( ५) बरोबरी केली. मार्क वॉ ( ४), आरोन फिंच ( ३) व मॅथ्यू हेडन ( ३) यांचा क्रमांक नंतर येतो.

डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श या जोडीने पहिल्या विकेटसाठी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली. २०११ मध्ये ब्रॅड हॅडीन व शेन वॉटसन यांनी कॅनडाविरुद्ध १८३ धावांची सलामी दिली होती.

पाकिस्तानविरुद्ध आज वॉर्नर व मार्श यांनी २५९ धावा जोडल्या आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील ही ओपनर्सनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. डेनिस हायनेस व ब्रायन लारा यांनी १९९२ मध्ये मेलबर्नवर १७५* धावा चोपल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २१ शतक झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर ( १५२ इनिंग्ज) तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. हाशिम आमला ( ११६ ) व विराट कोहली ( १३८) हे आघाडीवर आहेत. त्याने एबी डिव्हिलियर्स ( १८३), रोहित शर्मा ( १८६) व सचिन तेंडुलकर ( २००) यांचा विक्रम मोडला.

वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही विकेटसाठी डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श ( २५९) यांची भागीदारी ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. ख्रिस गेल व मार्लोन सॅम्युअल्स यांनी २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ३७२ धावा जोडल्या होत्या. सौरव गांगुली व राहुल द्रविड यांनी १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३१८, तिलकरत्ने दिलशान व उपल थरंगा यांनी २०११ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २८२ आणि डेव्हॉन कॉनवे व राचिन रविंद्र यांनी २०२३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २७३* धावा जोडल्या होत्या.

डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी २०१५मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध २६० धावा जोडल्या होत्या आणि त्यानंतर आज मिचेल मार्श व डेव्हिड वॉर्नर यांनी २५९ धावा चोपल्या. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीवीरांची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. तिलकरत्ने दिलशान व उपल थरंगा यांनी २०११ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध २८२ धावा चोपल्या होत्या.

वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीरांची तिसरी सर्वोत्तम भागिदारी ठरली. डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी अनुक्रमे २८४ ( वि. पाकिस्तान, २०१७) आणि २६९ ( वि. इंग्लंड, २०२२) धावांची भागीदारी केली होती.