वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाचा जलवा! पुन्हा झाली वनडेतील 'क्वीन'

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार अर्धशतकानंतर स्मृती मानधनाला मिळालं मोठं गिफ्ट

भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात रंगणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीत असलेल्या स्मृती मानधनाने आयसीसीच्या महिला वनडे क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर वनचा ताज मिळवला आहे.

इंग्लंडची कर्णधार नॅट सिल्हर ब्रंट हिला मागे टाकत स्मृती मानधना महिला वनडेतील नंबर वनची बॅटर ठरलीये.

वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. पहिल्या वनडे सामन्यात स्मृती मानधनाने प्रतिका रावलच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली होती.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दमदार अर्धशतकानंतर ती धावबाद होऊन परतल्याचे पाहायला मिळाले. या अर्धशतकीच्या जोरावर तिने पुन्हा एकदा वनडेतील बेस्ट बॅटर असल्याचे दाखवून दिले आहे.

आयसीसीच्या महिला वनडे क्रमवारीत स्मृती मानधनाही एकमेव भारतीय आहे जी टॉप १० मध्ये दिसून येते.

आयसीसी क्रमवारीतील दबदबा तिच्यासह टीम इंडियासाठी आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत आत्मविश्वास अधिक उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल.

स्मृती मानधना क्रिकेटच्या तिन्ही प्रारुपामध्ये टीम इंडियाकडून सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करतीये. टीम इंडियाला पहिली वहिली वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून देण्याची मोठी जबाबदारी तिच्या खांद्यावर असेल.

भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करणारी स्मृती मानधना ही संघाची उप कर्णधारही आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून तिने वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचे संकेतही दिले आहेत.

आता क्रमवारीत पुन्हा नंबर वनचा ताज मिरवत आपले स्थान कायम ठेवून ती वनडे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.

स्मृती मानधना ही आपल्या मैदानातील कामगिरीशिवाय सौंदर्यानं आणि खास अदाकारीनं क्रिकेट चाहत्यांना घायाळ करून सोडणारा चेहरा आहे. तिला नॅशनल क्रशचा टॅगही लागला आहे. सुंदर खेळीसह ती भारतीय महिला संघाचे स्वप्न साकार करणार का? ते पाहण्याजोगे असेल.