Sourav Ganguly Team India, IND vs BAN Test: टीम इंडिया घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका (IND vs BAN Test Series) खेळणार आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाईल. तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून सुरु होईल.
मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, केएल राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. बांगलादेशने पाकिस्तानात पहिली कसोटी मालिका जिंकल्याने भारत अनुभवी संघ उतरवणार आहे.
संघात अनेक बड्या नावांचा समावेश आहे. पण सौरव गांगुलीने एका युवा खेळाडूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. विराट, रोहित, बुमराह किंवा राहुल नव्हे तर एक युवा खेळाडू लवकरच कसोटी क्रिकेटचा सर्वकालीन सर्वोत्तम क्रिकेटपटू बनेल असे गांगुली म्हणाला आहे.
सौरव गांगुली म्हणाला, 'युवा खेळाडूंमध्ये मला त्याच्यावर विश्वास आहे. तो आता जसा खेळतो तसा खेळत राहिल्यास एक दिवस कसोटी क्रिकेटचा सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू बनेल. वनडे, टी२० मध्ये त्याला सुधारणेला वाव आहे. पण त्याचं टॅलेंट पाहता तो नक्कीच महान खेळाडू बनू शकेल.'
'मला असं वाटतं की रिषभ पंत हा सध्याच्या घडीला टीम इंडियातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक आहे. त्याला कसोटी संघात पुन्हा संधी मिळाली यात मला अजिबातच नवल वाटलेले नाही. तो भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेट खेळतच राहिल,' असेही गांगुली म्हणाला.