आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

रोहित-विराटसह सूर्यकुमारच्या पंक्तीत बसण्याचा डाव तो अगदी सहज साध्य करू शकतो.

भारतीय संघ युएईच्या मैदानात रंगणाऱ्या आशिया कप स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या स्पर्धेत टीम इंडियातील स्टार खेळाडूंना मोठा विक्रम नोंदवण्याची संधी आहे.

भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला यंदाच्या आशिया कप स्पर्धेत मोठा डाव साधण्याची संधी आहे. तो या स्पर्धेत सहज हा खास पल्ला गाठेल, अशी अपेक्षा आहे.

हार्दिक पांड्या हा गोलंदाजीशिवाय मोठी फटकेबाजी करून सामना फिरवण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. आतापर्यंतच्या आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत त्याने ११४ सामन्यातील ९० डावात १८ १३ धावा केल्या आहेत. यात त्याने पाच अर्धशतके झळकवताना त्याच्या भात्यातून १३४ चौकार आणि ९५ षटकार पाहायला मिळाले आहेत.

यंदाच्या आशिया कप स्पर्धेत ५ षटकार मारत टी-२० मध्ये षटकारांची शंभरी करण्याची मोठी संधी त्याच्याकडे आहे. याआधी फक्त ३ भारतीय फलंदाजांनीच हा डाव साधला आहे. जर हार्दिक पांड्याने ही कामगिरी केली तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १०० षटकारांचा पल्ला गाठणारा तो चौथा बॅटर ठरेल.

या यादीत रोहित शर्मा सर्वात आघाडीवर आहे. टीम इंडियाकडूनच नव्हे तर क्रिकेट जगतात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो नंबर वन आहे. हिटमॅनने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत २०५ षटकार मारले आहेत.

भारतीय टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव हा दुसरा भारतीय बॅटर आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात टीम इंडियाकडून शंभरहून अधिक षटकार मारले आहेत. त्याने आतापर्यंत १४६ षटकार मारले असून तो यावेळी दिडशेचा पल्ला पार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

विराट कोहलीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत १२४ षटकार मारले आहेत. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

येत्या काळात हार्दिक पांड्या किंग कोहलीलाही ओव्हरटेक करू शकतो.

सक्रीय भारतीय बॅटर्समध्ये लोकेश राहुल षटकारांच्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. केएल राहुलच्या भात्यातून ९९ षटकार पाहायला मिळाले आहेत. पण तो आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग नाही. भारतीय टी-२० संघात एखादी संधी मिळाली तर तोही हा पल्ला गाठू शकतो. पण सध्याच्या घडीला त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये कमबॅकची संधी मिळणं मुश्किलच वाटते.