यंदाच्या लिलावाबाबत सध्या बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. सर्व संघ आपापली रणनीती बनवण्यात व्यस्त आहेत. याच दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघातून करारमुक्त केले जाण्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
हार्दिकने दोन हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात अंतिम फेरी गाठली. संघ उत्तम वाटचाल करत होता, पण हार्दिक पांड्या मात्र गेल्या मोसमात मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता.
IPL 2024 दरम्यान हार्दिक गुजरात टायटन्सकडून मुंबईत आला. रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार करण्यात आले. यावरून बराच गदारोळही झाला होता. चाहत्यांनी हार्दिकला खूप ट्रोल केले, संघातही मतभेदाच्या बातम्या आल्या होत्या.
काही वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर खूश नसल्याच्या बातम्या सोशल मीडियात दिसून येत होत्या. मैदानातही मुंबई इंडियन्सच्या संघाची दरवर्षीप्रमाणे केमिस्ट्री जमून आली नव्हती. त्यामुळे IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरीही अत्यंत खराब राहिली.
रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला केवळ मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरूनच हटवले जाणार नाही, तर त्याला संघातूनही रिलीज केले जाण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, हार्दिकला मुंबई इंडियन्समधून करारमुक्त केले जाण्याची दाट शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवने यापूर्वीच टीम इंडियाचे कर्णधारपद मिळवले आहेत. आधी त्यासाठी हार्दिक पांड्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता हार्दिक पांड्याच्या हातून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही सूर्यकुमारकडे जाईल, अशा बातम्या येत आहेत.