एका व्यावसायिकाच्या घरी भज्जीचा जन्म झाला. त्याच्या वडिलांची बेयरिंगची फॅक्टरी होती, परंतु त्यांनी भज्जीला क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. हरभजन २० वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली.
तेव्हा त्यानं टीम इंडियाकडून वन डे व कसोटी संघात पदार्पण केले होते. १८व्या वर्षी त्यानं राष्ट्रीय संघाकडून पदार्पण केलं. १९९८साली त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत आणि न्यूझीलंडविरुद्ध वन डे संघात पदार्पण केले. पण, त्याचा साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्याला संघाबाहेर व्हावे लागले. अशात घर चालवण्यासाठी त्यानं क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तो अमेरिकेत ड्रायव्हर म्हणून काम करण्यास जाणार होता. पण, त्याच्या नशीबात क्रिकेटपटू होणे होतं.
कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेपही घेण्यात आला, परंतु त्याची शैली योग्य ठरवली गेली. २००१मध्ये त्यानं ऑस्ट्रेलिया मालिकेतून पुनरागमन केलं. अनिल कुंबळेला दुखापत झाल्यानंतर कर्णधार सौरव गांगुलीनं भज्जीला संघात खेळवण्याची मागणी केली. या मालिकेत टीम इंडियानं ०-१ अशा पिछाडीवरून २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. भज्जीनं तीन सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचाही समावेश होता. कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
२००८मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा भज्जीमुळे चर्चेत राहिला. त्यावेळी मंकीगेट प्रकरणामुळे भज्जीवर टीका झाली. अँड्य्रू सायमंडवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा आरोप भज्जीवर ठेवण्यात आला.
२००८मध्ये सुरू झालेल्या आयपीएलच्या पहिल्या पर्वात भज्जी मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि तेव्हा त्यानं किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या एस श्रीसंतला कानाखाली मारली होती. त्यानंतर त्याच्यावर संपूर्ण सत्र बंदी घातली गेली. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये त्यानं पाकिस्तानच्या मिसाबह उल हकविरुद्ध अखेरचं षटक फेकण्यास नकार दिला होता.
हरभजन सिंगनं २०१५ साली अभिनेत्री गीता बसरासह लग्न केलं.
भज्जीनं १०३ कसोटींत ४१७, २३६ वन डेत २६९ आणि २८ ट्वेंटी-२०त २५ विकेट्स घेतल्या.