Gautam Gambhir on MS Dhoni: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याबद्दल अनेकदा रोखठोक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे अनेक वेळा गंभीरला धोनीचे चाहते व समर्थकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.
तशातच आता गौतम गंभीरने पुन्हा एकदा धोनीबद्दल अतिशय मोठं विधान केलं आहे. त्याच्या या विधानाची चांगलीच चर्चाही रंगल्याचं दिसतंय. पाहा काय म्हणालाय गंभीर...
'आम्ही जेव्हा आपापल्या संघाचं नेतृत्व करायचो, तेव्हा आम्ही मैदानावरील एकमेकांचे शत्रू होतो. पण धोनी कर्णधार असताना मी दीर्घकाळ संघाचा उपकर्णधार होतो. त्यामुळे एक क्रिकेटर आणि माणूस म्हणून त्याच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे.'
'आमच्या दोघांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत फरक आहे. आमच्यात मतभेद आहेत. प्रत्येक जण खेळाकडे वेगळ्या नजरेने बघतो. धोनीची मतं वेगळी आहेत आणि माझी मतं वेगळी आहेत. पण त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे आणि तो शेवटपर्यंत राहिल.'
'मी १३८ कोटी भारतीयांसमोर सांगायला तयार आहे की, धोनीला कधीही कोणत्या गोष्टीची कमी भासू नये. पण जर दुर्दैवाने धोनीवर एखादी वाईट वेळ आली तर त्याच्या बाजूने उभं राहणारा आणि त्याला शक्य ते सर्व सहकार्य करणारा मी पहिला माणूस असेन.'
'धोनी कधीही अडचणीत आला तर त्याच्या मदतीला धावून जाणार मी पहिला असेन कारण त्याने भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान केलंय आणि तो माणूस म्हणूनही खूप चांगला आहे', असं अतिशय स्पष्टपणे गौतम गंभीरने सांगितलं.