भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यावर भारतीय संघाची निवड आणि प्लेइंग इलेव्हनबाबत टीका केली जाते. अनेकदा क्रिकेट चाहत्यांकडून त्याच्यावर विविध आरोपही केले जातात.
एखाद्या सामन्यासाठी संघ मैदानात उतरवणे, योग्य प्लेइंग इलेव्हन निवडणे आणि काही वेळा मॅचविनर खेळाडू संघाबाहेर बसवणे अशा गोष्टी गौतम गंभीरच्या काळात अनेकदा घडल्याचे दिसून आले आहे.
तशातच, ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने शतक तर विराटने अर्धशतक ठोकत सामना जिंकवला. पण भारत मालिका २-१ने हरला. या मुद्द्यावर तसेच संघ निवडीवर गौतम गंभीरने बीसीसीआयच्या मुलाखतीत रोखठोक मते मांडली.
गंभीर म्हणाला, 'मी खेळाडूंची संवाद साधण्याला महत्त्व देतो. तुम्ही प्रामाणिक, स्पष्ट संवाद साधलात तर गैरसमज होत नाहीत. तुम्ही प्रामाणिक असाल आणि मनापासून बोलत असाल खेळाडूही कोचचा निर्णय समजून घेतात'
'खेळाडू आणि कोच यांच्यामध्ये सतत संवाद होणे गरजेचे आहे. लोक काय बोलतात याकडे लक्ष देणे फारसे महत्त्वाचे नाही. ड्रेसिंग रूम मध्ये पारदर्शकता असणे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे'
'अनेकदा मला या गोष्टीची कल्पना असते की बाकावर बसलेला खेळाडू हा प्रतिभावान आहे तो प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळण्यासाठी पात्र आहे, पण तो दिवस पाहून ११ खेळाडूंची निवड करावी लागते.'
'तू आज संघाबाहेर आहेस असं एखाद्या खेळाडूला सांगणं दोघांसाठीही खूप कठीण असते. कारण खेळाडू निराश होतो. अशा वेळेस स्पष्ट संवाद गरजेचा असतो आणि प्रामाणिकपणा गरजेचा असतो.'
'सामन्याच्या दिवशी ११ खेळाडूंची निवड करणे हा माझ्यासाठी सर्वात कठीण क्षण असतो. अनेकदा इच्छा नसूनही काही खेळाडूंना बाहेर बसवावे लागते. कारण आपल्याला ११ खेळाडूच खेळवता येतात.'
'एक भारतीय आणि देशप्रेमी म्हणून तुम्ही कधीही मालिका हरल्याचे सेलिब्रेशन करू शकत नाही. एखाद्याने वैयक्तिक चांगली खेळी केली तर त्याचे कौतुक व्हायलाच हवे पण आपण वनडे सिरीज हरलो हे सत्य आहे,' अशी रोखठोक मतं गौतम गंभीरने मांडली.