भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राची हिंदी कॉमेंट्री खूप लोकप्रिय आहे. आकाश चोप्रा ज्या विनोदी शैलीत कॉमेंट्री करतो त्यामुळे सर्वच चाहत्यांना भुरळ पडते. लक्षणीय बाब म्हणजे समालोचकाद्वारे आकाश चोप्रा प्रत्येक मालिकेत ३५-४० लाखांपर्यंतचे मानधन घेतो. माहितीनुसार, आकाशची कमाई केवळ कॉमेंट्रीमधून ८ कोटींच्या आसपास आहे. आकाश चोप्राच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर त्याने भारतासाठी केवळ १० कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २३च्या सरासरीने फलंदाजी करत ४३७ धावा केल्या आहेत.
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क क्रिकेटचे मुख्य सूत्रधार जतीन सप्रू हे सुप्रसिद्ध समालोचक म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला जतिन आधी फक्त पोस्ट कव्हरेज होस्ट करताना दिसला होता. पण कालांतराने तो समालोचनही करू लागला आणि आज तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात आपल्या जबरदस्त कॉमेंट्रीने सर्वांचे मनोरंजन करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जतीन सप्रू याची एकूण संपत्ती ७ मिलियन आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न १.७५ कोटी रूपये असल्याचे बोलले जाते. तर त्याला एका सामन्यासाठी सुमारे १.५ लाख रुपये मानधन मिळते.
भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटर संजय मांजरेकर यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय फलंदाज एका मालिकेतील कॉमेंट्रीसाठी ४० लाख रुपये घेतात. खरं तर ते कॉमेंट्री करून वर्षाला सुमारे ७.४० कोटी कमावतात. याशिवाय संजय यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल भाष्य करायचे झाले तर त्यांनी भारतीय संघासाठी ३७ कसोटी आणि ७४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी स्टार फलंदाज सुनील गावसकर हे देखील क्रिकेट समालोचन जगतातील मोठे नाव आहे. गावसकर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये समालोचन करताना दिसतात. गावसकर हे एका सामन्यात समालोचन करण्यासाठी ४-४.५ लाख रूपये एवढे मानधन घेतात. खरं तर गावसकर वर्षाला सुमारे ७.४३ कोटी रुपये कमावतात. याशिवाय सुनिल गावसकर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी १२५ कसोटी आणि १०८ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
६१ वर्षीय हर्षा भोगले हे समालोचन जगतातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. त्यांचा सुरेल आवाज प्रेक्षकांना खूप आवडतो. हर्षा हे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांसाठी समालोचन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हर्षा भोगले यांच्या मानधनावर भाष्य करायचे झाले तर, तर ते एका सामन्यात कॉमेंट्री करून साडेचार ते पाच लाख रुपये कमावतात. यासोबतच हर्षा भोगले दरवर्षी कॉमेंट्री करून ८ कोटी कमावतात.