Ravi Shastri Team India : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन जवळपास एक महिना झाला आहे. शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ T20 विश्वचषकासोबत संपला आणि त्यांच्या जागी राहुल द्रविडची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.
मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडल्यानंतर शास्त्रींनी अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. संघ निवडीत आपली कोणतीही भूमिका नसायची असं त्यांनी सांगितलं. शिवाय अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यापैकी एकाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संघात समाविष्ट करायला हवं होतं, असं मत शास्त्री यांनी व्यक्त केलं.
टीम निवडीमध्ये माझी कोणतीही भूमिका नसायची. परंतु वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये तीन विकेटकिपर्सच्या निवडीवर मी खुश नव्हतो. अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यांच्यापैकी कोणाला टीममध्ये संधी द्यायला हवी होती असं रवी शास्त्री टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
एकाच संघात महेंद्र सिह धोनी, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या तिन्ही विकेट किपर्सच्या निवडीमागील लॉजिक काय होतं. मी सिलेक्टर्सच्या निर्णयांमध्ये कधीही आडकाठी केली नाही. ज्यावेळी माझं मत विचारलं जायचं तेव्हाच मी बोलायचो, असंही ते म्हणाले.२०१९ मध्ये टीम इंडियानं सेमी फायनल्समध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
रायुडूचा टीममध्ये समावेश न केल्यावरून त्यावेळी टीकाही झाली होती. दरम्यान, त्याला आपण नंबर चारचा खेळाडू म्हणून पाहतो, असं वर्ल्ड कपपूर्वी कोहली म्हणाला होता. परंतु रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आलं होतं.
दरम्यान, बॅटिंग फिल्डिंग आणि अन्य बाबी पडताळूनच त्याला संघात स्थान देण्यात आल्याचं माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी सांगितलं होतं. यानंतर वर्ल्ड कप पाहण्यासाठी आपण थ्री डी ग्लास ऑर्डर केले असल्याचं रायुडूनं ट्वीट करत म्हटलं होतं.
शास्त्री आणि कोहली ही जोडी तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकली, पण एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकली नाही. आपल्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाची आठवण करून देताना शास्त्रींनी एक खळबळजनक दावा केला आहे. काही लोकांना मी भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून नको होतो, असा दावा त्यांनी केला आहे.
माझ्या दुसर्या कार्यकाळात मी एका मोठ्या वादात अडकलो होतो, त्यानंतर अनेकांना मी प्रशिक्षक म्हणून नको होतो. त्यांच्या वागणुकीवरुन मला ते स्पष्ट दिसतं होतं. त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीला निवडलेही होते, पण ९ महिन्यांनंतर ज्या माणसाला बाहेर फेकले, त्याच माणसाकडे ते परत आले. हे तेच लोक होते, ज्यांना माझ्यासह भरत अरुण कोचिंग स्टाफमध्ये नको होते, असंही शास्त्री म्हणाले
शास्त्री पुढे म्हणाले, त्यांना मी आणि भरत अरुणला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून द्यावं असंही वाटत नव्हतं. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा परिस्थिती कशी बदलली आहे हे जाणवतं. मी लोकांकडे बोट दाखवत नाही, पण काही खास लोक होते, ज्यांनी मला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक न होण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. दरम्यान, रवी शास्त्रींनी त्या व्यक्तींचे नावे सांगितली नाहीत.