न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेचा पराभव करताच भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आधीच फायनलमध्ये प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव झाल्याने भारताचा WTC फायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. याशिवाय भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अखेरचा कसोटी सामना अनिर्णित करून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची मालिका देखील खिशात घातली.
या मालिकेतील पहिले 2 सामने यजमान भारताने जिंकले तर तिसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र, अखेरचा कसोटी सामना अनिर्णित झाल्याने भारताने 2-1 ने मालिका जिंकली.
अशातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये लोकेश राहुल आणि शुबमन गिल यातील कोणाला संधी मिळणार याबाबत मोठे विधान केले आहे.
लोकेश राहुलऐवजी शुबमन गिलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये संधी मिळायला हवी, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे.
खरं तर लोकेश राहुल मागील अनेक दिवसांपासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतही त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
खराब फॉर्मच्या कारणास्तव लोकेश राहुलला प्रथम भारतीय संघाच्या उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले.
लोकेश राहुलच्या जागी शुबमन गिलचा तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. मिळालेल्या संधीचा फायदा घेत गिलने अखेरच्या सामन्यात शतक झळकावले.
शतकी खेळीसोबतच गिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठीही आपली बाजू मजबूत केली आहे. त्यामुळे 7 जून ते 12 जून दरम्यान ओव्हल येथे होणाऱ्या या फायनलमध्ये गिलला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
दिनेश कार्तिकच्या मते, शुबमन गिलला मोठ्या कालावधीपर्यंत संधी मिळायला हवी. त्यामुळेच त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करायला हवा.
क्रिकबझच्या वृत्तानुसार दिनेश कार्तिकने म्हटले, 'मला पाहायचे आहे की लोकेश राहुलला काय वाटेल. कारण त्याला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यात मजा येत नाही. कसोटीतील विकेटकीपिंग खूप वेगळे असते. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मी शुबमन गिलसोबत जाईन, यात शंका नाही.'
'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्याआधी गिलने शतक झळकावले आहे. त्यामुळे मला वाटते की, तो या फॉरमॅटमध्ये बराच काळ असेल आणि म्हणूनच मी त्याच्याकडे आशेने पाहतो. त्याने भारतासाठी सलामी कायम ठेवावी अशी माझी इच्छा आहे', असे कार्तिकने आणखी सांगितले.