ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधील अखेरचा सामना खेळला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मालिकेतील अखेरचा सामना वॉर्नरचा शेवटचा सामना ठरला. त्याने वन डे क्रिकेटमधून देखील निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
२००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने नवीन वर्षाच्या सुरूवातीला क्रिकेट विश्वाला धक्का देत वन डे क्रिकेटला रामराम केले. त्यामुळे आता वॉर्नर केवळ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय आणि जगभरातील विविध लीगमध्ये खेळताना दिसेल.
क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्नरने पत्नी कँडिससाठी एक लांबलचक भावनिक पोस्ट शेअर केली. वॉर्नरने पोस्टमध्ये कँडिसचे आभार तर मानलेच पण मनमोकळेपणाने आपले प्रेम व्यक्त केले.
तो म्हणाला की, मी आज जिथे आहे तिथे पोहोचवण्यात कँडिसने खूप मदत केली आहे. वॉर्नर आणि कँडिस यांना तीन मुली आहेत.
वॉर्नरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, 'माझ्या मनात खूप भावना आहेत. मी तुझ्याबद्दल काय बोलू... कँडिस, प्रामाणिकपणे सांगायचे तर आज मी जिथे आहे तिथे मला पोहोचवण्यात तुझी खूप मदत झाली. हे मी याआधीही अनेकवेळा सांगितले आहे पण मी ते पुन्हा सांगतो. तू पहाटे ४ वाजता उठतेस... क्रिकेटपटूंना हे करण्याची गरज नाही पण तू मला शिस्तीचा खरा अर्थ समजावून सांगितला.'
'मला या शिस्तीचा खरा अर्थ माहित नव्हता. पण नंतर माझी मानसिकता बदलली. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला जे आवडते ते करण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल मी तुझे जितके आभार मानू तितके ते कमीच आहेत'
तसेच तू अनेक आव्हानांचा सामना करून मला पाठिंबा दिलास. तुझे साहस आणि समर्थन हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. ज्या पद्धतीने तू माझे आयुष्य बदलले आहेस, त्यासाठी मी खरंच तुझा मनापासून आभारी आहे, असेही वॉर्नरने नमूद केले.
'मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही. तुझ्यामुळेच मला प्रेमाचा खरा अर्थ समजला. माझ्यावर स्वत:पेक्षा जास्त विश्वास ठेवून पुढे जाण्याची ताकद दिलीस. तुझ्या या प्रेमानेच मला एक चांगला माणूस म्हणून घडवले आहे', अशा शब्दांत त्याने पत्नीचे आभार मानले.
'मी दूर असताना तू आपल्या मुलींची सतत काळजी घेतली. हे आव्हानात्मक किंवा खूप कठीण आहे असे तुझ्या तोंडून कधीच ऐकले नाही. तू खूप मजबूत आणि निष्ठावान आहेस. आपल्या तीन लाडक्या मुलींसाठी तुझ्यापेक्षा चांगला आदर्श दुसरा कोणी नाही. आयुष्याच्या या प्रवासात माझा भागीदार आणि माझी शक्ती बनल्याबद्दल धन्यवाद.'
'तुझे प्रेम, तुझी शक्ती आणि तुझ्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तू एक विलक्षण स्त्री आहेस तू माझ्या आयुष्यात आहेस याने मी धन्य झालो आणि नेहमी तुझी काळजी घेईन. आय लव्ह यू..', असे वॉर्नरने अधिक म्हटले.