पाकिस्तानच्या यजमानात सध्या आशिया चषकाची स्पर्धा खेळवली जात आहे. २ सप्टेंबरला या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पावसाच्या कारणास्तव तो सामना अनिर्णित राहिला.
भारताला गोलंदाजीची तर पाकिस्तानला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, प्रथम गोलंदाजी करताना पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना चीतपट केले.
याचाच दाखला देत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष नजम सेठीनं एक हास्यास्पद दावा केला. भारतीय संघ पाकिस्तानला घाबरत असल्याचं विधान सेठीनं केलं होतं.
नजम सेठीच्या या विधानावर बोलताना भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगनं त्याचा चांगलाच समाचार घेतला. 'भारतीय संघ कधीच कोणाला घाबरला नाही आणि याआधीही पाकिस्तानला अनेकदा आम्ही पराभवाची धूळ चारली आहे', असं भज्जीनं म्हटलं.
आशिया चषकात सुपर ४ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्यानं राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष नजम सेठीनं यावरून बीसीसीआयवर निशाणा साधला होता आणि म्हटलं होतं की, भारतीय संघाला पराभवाची भीती आहे आणि म्हणूनच ते सामना इतरत्र खेळवण्याचा प्रयत्न करत आहे.
हरभजन सिंगने म्हटलं, 'नजम सेठी आजकाय वाट्टेल ते बोलत सुटला आहे. तो कशाच्या आधारावर हे सगळं बोलतो याची मला कल्पना नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील इतिहास त्याला कोणीतरी समजावून सांगायला हवा.'
'भारतानं त्यांना किती वेळा पराभूत केलं याबद्दल त्यानं माहिती घ्यावी. भारतीय संघ कधीच कोणाला घाबरत नाही, नजम सेठीनं मूर्खासारखं बोलणं बंद करायला हवं', अशा शब्दांत भज्जीनं सेठीचा समाचार घेतला.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन)