भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी संघ व्यवस्थापन आणि वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यातील 'विसंवादाच्या' चर्चांवर रोखठोक भाष्य केले.
रोहित-विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून आणि शुभमन गिलकडे वनडेचे कर्णधारपद गेल्यापासून ड्रेसिंग रुममधील मतभेदाची इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली होती.
या साऱ्या चर्चांवर उत्तर देताना कोटक म्हणाले, 'विराट आणि रोहित दोघेही उत्साहाने सराव करतात. त्यांना आपल्या तंदुरुस्तीची चांगली समज आहे. ते नेट प्रॅक्टिससाठी सर्वात आधी येतात.'
'रोहित-विराट अत्यंत अनुभवी, व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना काय करायचे आहे हे त्यांना नीट ठाऊक आहे. ते आपला अनुभव इतर युवांशी सतत शेअर करत असतात.'
'मी नेहमीच रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मुख्य कोच गौतम गंभीर यांच्याशी सविस्तर चर्चा करताना पाहिलेले आहे. त्यांच्यात कुठल्याही पद्धतीचा विसंवाद नाही.'
विराट-रोहित केवळ सध्याच्या मालिकेबद्दलच नाही, तर २०२७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या नियोजनाबाबतही गंभीरशी संवाद साधत असतात.'