भारतात होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे ८ संघ ठरले आहेत आणि आता उर्वरित दोन जागांसाठी कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आतापर्यंत यजमान भारतासह, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे थेट पात्र ठरले आहेत.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दोन जागांसाठी आयर्लंड, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या १० संघांमध्ये लढत आहे. उद्यापासून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि झिम्बाब्वे येथे ही स्पर्धा खेळवली जात आहे.
१८ जूनपासून सुरू होत असलेल्या पात्रता स्पर्धेतील दहा संघांची प्रत्येकी पाच अशा दोन गटांत विभागणी केली गेली आहे आणि राऊंड रॉबीन पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या दोन्ही गटांतील प्रत्येकी ३ संघ सुपर सिक्समध्ये खेळतील.
सुपर सिक्समधील संघांमध्ये लढती होतील आणि अव्वल दोन संघ भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळतील. पण, हे अव्वल दोन संघांमध्ये फायनलही होईल.
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज हे दोन माजी विजेते या शर्यतीत आघाडीवर आहेत. पण, सराव सामन्यांतील झिम्बाब्वे, आयर्लंड यांची कामगिरी पाहता ते आव्हान देऊ शकतात.