सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. पाहुण्या किवी संघाने मालिकेतील सलामीचा सामना जिंकून आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमान भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
'करा किंवा मरा'च्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. पण, 100 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक सेनेला संघर्ष करावा लागला.
किवी गोलंदाजांनी यजमानांच्या अडचणीत वाढ करत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. अखेर टीम इंडियाने 6 गडी आणि 1 चेंडू राखून विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली.
न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद केवळ 99 धावा केल्या. किवी संघाकडून कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही.
भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर कर्णधार हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, दीपक हुडा, कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
100 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी सावध खेळी केली. मात्र, संघाची धावसंख्या 17 असताना शुबमन गिलच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. तर इशान किशन नवव्या षटकात 19 धावांची साजेशी खेळी करून तंबूत परतला.
खरं तर इशान किशनचा पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात मायकेल ब्रेसव्हेलने अवघ्या 4 धावांवर असताना त्रिफळा उडवला होता. तसेच यजमान संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
दुसऱ्या ट्वेंटी-20 मध्ये देखील किशन धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले. कालच्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 19 धावा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठे विधान केले आहे.
गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना म्हटले, 'बॅटिंग युनिट म्हणून टीम इंडिया फिरकी गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसली आहे. काही वेळा मोठे षटकार मारणे सोपे असते. पण, स्ट्राईक सातत्याने रोटेट करण्याची क्षमता याची कमी जाणवते. जेव्हा इशान किशन बाद झाला तेव्हा हे अगदी स्पष्ट झाले.'
'मला वाटते की या युवा खेळाडूंनी लवकरात लवकर स्ट्राईक कसे रोटेट करायचे ते शिकले पाहिजे. कारण अशा खेळपट्टीवर मोठे षटकार मारणे सोपे नसते. बांगलादेशात द्विशतक झळकावल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते आश्चर्यकारक आहे. त्यानंतर त्याने संघर्ष केला आहे, ज्या प्रकारची खेळी खेळली त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल असे सर्वांना वाटत होते पण तसे झाले नाही', असे गौतम गंभीरने अधिक म्हटले.
दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी संघाला केवळ 99 धावा करता आल्या. अर्शदीप सिंगने 2 षटकात 7 धावा देत 2 बळी घेतले.
सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 19.5 षटकांत धावांचा पाठलाग केला. सूर्यकुमार यादव 26 धावा करून नाबाद राहिला तर हार्दिक पांड्याने 15 धावांची खेळी केली.