भारतीय संघाने नुकतेच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सहज पराभव केला आणि रोहितने कर्णधार म्हणून दुसरी ICC ट्रॉफी जिंकली.
२०२४चा टी२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी२० मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदानंतर रोहित वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार अशा चर्चा रंगल्या होत्या, पण त्याला चुकीच्या ठरल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने स्पष्ट केले की, तो सध्या तरी निवृत्तीचा विचार करत नाहीये. तसेच, आणखी एका मुलाखतीत त्याने आगामी २०२७चा वनडे वर्ल्डकप देखील खेळण्याचे संकेत दिले.
रोहित शर्मा निवृत्त होत नसल्याचे स्पष्ट झाले असले तरीही क्रिकेटवर्तुळात अजूनही चर्चा सुरू आहेत. याच चर्चांवरून टीम इंडियाचा रनमशिन विराट कोहली याचा खास मित्र एबी डीव्हिलियर्स याने रोखठोक मत व्यक्त केले आहे.
'रोहितने निवृत्त होण्याचा प्रश्नच कुठे येतो? केवळ कर्णधार म्हणूनच नाही तर एक फलंदाज म्हणून त्याची आकडेवारी उत्तम आहे. फायनलमध्ये ७६ धावांची दमदार खेळी करत त्यानेच भारताच्या विजयाचा पाया रचला.'
'अंतिम सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना कायम एक दडपण आणि दबाव असतो. पण रोहितच्या त्या खेळीने संघावरील तो दबाव पूर्णपणे बाजूला सारला आणि संघाला एक धडाकेबाज सुरुवात मिळवून दिली.'
'माझं स्पष्ट मत आहे की रोहितला आता निवृत्तीचा विचार करायची काहीही गरज नाही. टीकाकार काहीही बोलत असतील तरी त्याकडे लक्ष देण्याची काहीही गरज नाही. त्याचे रेकॉर्ड्स हेच टीकाकारांना उत्तर आहे.'
'इतर कर्णधारांच्या तुलनेत रोहितची विजयाची टक्केवारी जवळपास ७४% आहे. इतरांपेक्षा हे आकडे चांगले आहेत. रोहित आणखी खेळत राहिला, तर नक्कीच वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक ठरेल.'