11 भारतीय क्रिकेटपटूंची राजकारणात 'बॅटिंग', काहींना मिळाली प्रसिद्धी, काही झाले 'चीतपट'

indian cricketer in politics: भारतात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर राजकारणात नशीब आजमावले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांनी क्रिकेटनंतर आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला होता. नवाब पतौडी यांनी दोन लोकसभा निवडणुका लढवल्या मात्र त्यांना यश मिळाले नाही. दोन लोकसभा निवडणुका हरल्यानंतर पतौडी यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीने राजकारणात पदार्पण करत गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्याने पूर्व दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेना आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. या माजी भारतीय सलामीवीराने जवळपास 7 लाख मतांनी निवडणूक जिंकून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली राजकीय खेळी सुरू केली होती. अझहरने 2009 मध्ये सार्वत्रिक निवडणूक जिंकली आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून तो खासदार झाला. अझरुद्दीनने 1990 च्या दशकात 47 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

भारतासाठी 51 कसोटी आणि 136 वन डे सामने खेळलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी 2004 च्या लोकसभा निवडणुकीपासून राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले नव्हते. तर 2016 मध्ये त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळाले. मात्र त्यानंतर त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा विधानसभेला पराभव झाला.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मनोज तिवारीने देखील राजकारणात प्रवेश केला. बंगालच्या दिग्गज खेळाडूने 2021 मध्ये अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोज तिवारीने 2021मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक शिबपूर मतदारसंघातून लढवली होती. यात त्याला विजय मिळाला आणि नंतर त्याची क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद कैफने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली. कैफने 2014 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून लढवली होती. पण पहिल्याच प्रयत्नात तो फ्लॉप झाला. यानंतर त्याने राजकारणातून संन्यास घेतला.

भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद यांनी बिहारमधील दरभंगा येथून तीनवेळा भाजपकडून निवडणुक जिंकली. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे वडील भागवत झा आझाद हे काँग्रेसचे नेते होते, ज्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. कीर्ती आझाद हे 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते.

सुनील गावसकर यांच्यासोबत कसोटीमध्ये सलामीला येणारे चेतन चौहान हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिले आहेत. 1981 मध्ये त्यांची क्रिकेट कारकीर्द संपताच त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि जनता पक्षात प्रवेश केला. ते उत्तर प्रदेशात कॅबिनेट मंत्री होते. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट 2020 रोजी निधन झाले.

भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लोकभारती पक्षात प्रवेश केला. 2009 मध्ये कांबळी मुंबईतील विक्रोळी येथून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. यानंतर कांबळीने देखील राजकारण सोडले. विनोद कांबळी हा सर्वात जलद 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे. विनोद कांबळीने केवळ 12 डावात 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या.

क्रिकेटपासून वेगळे झाल्यानंतर मनोज प्रभाकर यांनी राजकारणात नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना यामध्ये यश मिळाले नाही. मनोज यांच्यावर त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत फिक्सिंगचा आरोप झाला होता.

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने अलीकडेच राजकारणाच्या खेळपट्टीवर पाऊल ठेवले आहे. हरभजनने आम आदमी पक्षात प्रवेश केला असून तो राज्यसभेचा खासदार आहे.