आगामी 'आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६' सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात मोठे राजकीय आणि क्रीडा युद्ध पेटले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे. या वादात आता पाकिस्ताननेही उडी घेतली असून बांगलादेशच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची तयारी दर्शवली आहे.
हा वाद बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याच्यावरून सुरू झाला. बीसीबीच्या दाव्यानुसार, बीसीसीआयच्या सूचनेवरून मुस्तफिजूरला कोलकाता नाईट रायडर्स संघातून बाहेर काढण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी गंभीर आरोप केले. "भारतीय क्रिकेट अधिकाऱ्यांची धोरणे जातीयवादी आहेत. जर आमचा एक खेळाडू तिथे सुरक्षित नसेल, तर पूर्ण संघ भारतात कसा काय सुरक्षित वाटेल?" असा सवाल करत त्यांनी संघ भारतात न पाठवण्याची धमकी दिली.
बांगलादेश आणि भारत यांच्यातील या तणावात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली संधी शोधली आहे. श्रीलंका बांगलादेशचे सामने आयोजित करण्यास असमर्थ असेल, तर पाकिस्तान सर्व सामन्यांचे यजमानपद स्वीकारण्यास तयार आहे. पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सारख्या मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव असून त्यांची मैदाने सज्ज आहेत, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयसीसीने अद्याप बांगलादेशच्या पत्राला उत्तर दिलेले नाही. मात्र, जर बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, तर विश्वचषकाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.
टी-२० विश्वचषक २०२६: बांगलादेशचे भारतातील वेळापत्रक
आयसीसीच्या वेळापत्रकानुकार, बांगलादेशला २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये काही सामने भारतीय भूमिवर खेळायचे आहेत. येत्या ७ फेब्रुवारीला बांगलादेशचा संघ वेस्ट इंडीजशी (ईडन गार्डन्स, कोलकाता) दोन हात करणार आहे. त्यानंतर ९ आणि १४ फेब्रुवारीला अनुक्रमे इटली आणि इंग्लंडशी भिडणार आहे. १७ फेब्रुवारीला बांगलादेशचा सामना नेपाळशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे.
टी२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघ
लिटन कुमार दास (कर्णधार), सैफ हसन (उपकर्णधार), तन्झीद हसन, परवेझ हुसेन इमोन, तौहिद हृदयॉय, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन आणि शोरिफुल इस्लाम.