Afghanistan Cricket Team Has Been Fined : अफगाणिस्तानच्या संघाला हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात रंगलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेच्या संघानं घरच्या मैदानातील १२ वर्षांचा दुष्काळ संपवत एक डाव आणि ७३ धावांनी अफगाणिस्तानला पराभवाची धूळ चारली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अफगाणिस्तानच्या अख्ख्या संघावर कारवाई केली आहे. हे म्हणजे पराभवानंतर अफगाणिस्तानच्या संघाच्या जखमेवर मीठ चोळण्यातला प्रकार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आधी पराभव, मग ICC कडून सर्व खेळाडूंवर झाली कारवाई
झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाले. यजमान संघाने एका डावात ३५९ धावा केल्या. पण अफगाणिस्तानला दोन्ही डावत तेवढ्या धावा करता आल्या नाही. त्यात गोलंदाजीत टाइमपास नडला आणि प्रत्येक खेळाडूला त्याची किंमत मोजावी लागली. झिम्बाब्वेच्या पहिल्या डावात स्लो ओव्हर रेटच्या कारणास्तव अफगाणिस्तानच्या खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे. दंडात्मक स्वरुपात प्रत्येक खेळाडूच्या मानधनातील २५ टक्के रक्कम कपात करण्याची शिक्षा आयसीसीने दिली आहे.
ZIM vs AFG Test : कसोटीत झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय; १२ वर्षांनी घरच्या मैदानात मारली बाजी
५ षटकांमुळे २५ टक्के पगार कपातीची नामुष्की
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात झिम्बाब्वेच्या संघाने एकाच डावात फलंदाजी केली. यात त्यांनी ३५९ धावा केल्या होत्या. या डावात अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित वेळेत पाच षटके कमी टाकली. परिणामी सामनाधिकारी रिची रिचर्ड्सन यांनी संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कपात करण्याची शिक्षा ठोठावली. अफगानिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याने आपली चूक मान्य केल्यामुळे याची कोणतीही सुनावणी करण्याची वेळ आली नाही.
कसोटीत झिम्बाब्वेनं साधला बरोबरीचा डाव
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानातील डावासह धावांनी पराभूत होण्याआधी अफगाणिस्तानच्या संघाने २ कसोटी सामने जिंकले होते. तर झिम्बाब्वेच्या संघानं फक्त एकमेव विजय नोंदवला होता. दोन्ही संघातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. पाच सामन्यात डावासह धावांनी विजयाचा डाव साधत झिम्बाब्वेच्या संघाने अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात २-२ असा बरोबरीचा डाव साधला आहे.