Join us
Daily Top 2Weekly Top 5

रियुनियन : सचिन, युवी, झॅक... आठ वर्षांनंतरची भेट लई झ्याक

भारतीय संघाने 2011 मध्ये आजच्याच दिवशी वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 10:54 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाने 2011 मध्ये आजच्याच दिवशी वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं हेलिकॉप्टर शॉट्स मारून भारताच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले होते. भारतीय संघाने 28 वर्षांचा वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ 2 एप्रिल 2011 मध्ये संपवला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि युवराज सिंग यांनी या आठवणीला उजाळा देणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर तेंडुलकरचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पूर्ण झाले होते. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान युवराज सिंगने पटकावला होता, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये झहीर आघाडीवर होता.महेला जयवर्धनेच्या 103 धावांच्या जोरावर श्रीलंका संघाने 6 बाद 274 धावा उभ्या केल्या. कर्णधार कुमार संगकारानेही 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या लक्ष्याचा पाठला करताना मात्र विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दिग्गज स्वस्तात माघारी परतले आणि स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. पण, गौतम गंभीर एका बाजूने खिंड लढवत राहिला. त्याने विराट कोहलीसह तिसऱ्या विकेटसाठी 83 आणि महेंद्रसिंग धोनीसह चौथ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी केली. दुर्दैवाने 97 धावांवर तो माघारी परतला, परंतु त्याने भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला होता. धोनी आणि युवराज सिंग यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने 6 विकेटने हा सामना जिंकला.या सामन्यानंतर युवराज सिंग मैदानावर ढसा ढसा रडताना जगाने पाहिला. त्याने गुरू तेंडुलकरला मारलेली मिठी हा आय कॅचिंग क्षण होता. तेंडुलकरचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न त्या दिवशी पूर्ण झाले होते. युवराजने या संपूर्ण स्पर्धेत 362 धावा व 15 विकेट्स घेतल्या आणि त्याला सर्वोत्तम खेळाडू  म्हणून गौरविण्यात आले. या स्पर्धेत झहीर खानने सर्वाधिक 21 विकेट्स घेतल्या होत्या. वर्ल्ड कप संघातील हे तीन भिडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य आहेत. वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा देताना मुंबई इंडियन्सने या तिघांचा एक खास फोटो, खास मॅसेजसह शेअर केला आहे.

टॅग्स :युवराज सिंगसचिन तेंडुलकरझहीर खानमुंबई इंडियन्सआयसीसी