Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवा खेळाडूंनी केले प्रभावित, राहुल द्रविडकडून शानदार कौतुक

युवा खेळाडूंनी शानदार खेळ करत प्रभावित केले. त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता जबरदस्त होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 05:33 IST

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन : ‘आम्ही युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलो होतो. इंग्लंडमध्ये खेळलेले बहुतांश खेळाडू या दौऱ्यावर आले नव्हते, पण तरी युवा खेळाडूंनी शानदार खेळ करत प्रभावित केले. त्यांनी दाखवलेली व्यावसायिकता जबरदस्त होती,’ असे सांगत भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी युवा क्रिकेटपटूंचे कौतुक केले. 

द्रविड यांनी सांगितले की, ‘काही सामने रोमांचक झाले आणि असे सामने जिंकणे एका युवा संघासाठी चांगले संकेत ठरले. शिखर धवनने शानदार नेतृत्व केले. सर्व खेळाडू आणि कर्णधाराला शानदार कामगिरीसाठी शाबासकी.’ आता भारतीय संघ शुक्रवारपासून विंडीजविरुद्ध टी-२० मालिका खेळेल.

शुभमन गिलचे विशेष कौतुक करताना धवनने त्याची तुलना रोहित शर्माशी केली. धवन म्हणाला की, ‘गिलचे तंत्र खूप चांगले आहे आणि तो एक शानदार फलंदाज आहे. माझ्या मते त्याच्यात काही प्रमाणात रोहितची झलक दिसते. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, ते पाहून असे वाटते की, त्याच्याकडे बराच वेळ आहे. त्याची नाबाद ९८ धावांची खेळी पाहून चांगले वाटले. अर्धशतकाचे मोठ्या खेळीत कसे रूपांतर करायचे हे त्याला माहीत आहे.

आव्हानाचे संधीत रूपांतर केले : शिखर धवन

‘एका कर्णधाराला आपल्या खेळाडूंकडून ज्या कामगिरीची अपेक्षा असते, तशीच कामगिरी युवा खेळाडूंनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत केली. युवा खेळाडूंनी आपली जिद्द दाखवली आणि समोर आलेल्या आव्हानांचे त्यांनी संधीत रूपांतर केले,’ अशी प्रतिक्रिया भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील कर्णधार शिखर धवन याने दिली.   तो म्हणाला की, ‘संपूर्ण मालिकेत संघाने केलेल्या खेळावर मला गर्व आहे. प्रत्येक सामन्यात आम्ही जिद्द दाखवली आणि आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर केले. प्रत्येक खेळाडूने ज्याप्रकारे आपले योगदान दिले, ते पाहून आनंद झाला.   ज्या खेळाची अपेक्षा असते, तसाच खेळ संघाने सादर केला.’ 

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघशिखर धवन
Open in App