Team India, ICC World Test Championship 2025-2027 Standings: भारतीय संघाने इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत रोमांचक विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने २२४ तर इंग्लंडने २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे इंग्लंडचा विजय दृष्टीपथात होता. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची गरज असताना, भारतीय गोलंदाजांनी ४ गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेल भारतीय संघाला किती फायदा झाला, जाणून घ्या.
नव्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सर्कलमधील ही भारताची पहिलीच कसोटी मालिका होती. या मालिकेतील ५ सामन्यांपैकी भारताने दोन सामने जिंकले तर दोन सामने गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. या मालिकेअंती भारतीय संघाला महत्त्वाचे १२ गुण मिळाले. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शेवटच्या सामन्याआधी भारतीय संघ चौथ्या तर इंग्लंड तिसऱ्या स्थानी होता. पण शेवटच्या सामन्यानंतर या दोघांच्या स्थानांची आदलाबदल झाली. आता भारतीय संघ २८ गुणांसह तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ २६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या संघाला षटकांची गती संथ राखल्याने दंड बसला. त्यामुळे त्यांचे २ गुण वजा करण्यात आले. सध्या गुणतालिकेत भारताच्या वर ऑस्ट्रेलिया अव्वल तर श्रीलंका आहेत. ऑस्ट्रेलिया ३ विजयांसाह ३६ गुणांसह अव्वल, तर श्रीलंका १ विजयासह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
सिराज विजयानंतर काय म्हणाला?
"आम्ही जिंकलोय याचा मला खूप आनंद आहे. मला माझ्या भावना शब्दांत मांडता येऊ शकत नाहीत. काल जेव्हा माझ्याहातून कॅच सुटला, तेव्हा मला वाटलं होतं की सामना आमच्या हातून निसटला. कारण काल जर त्यावेळी हॅरी ब्रूक आउट झाला असता तर आम्ही खूप आधीच जिंकलो असतो. पण ब्रूकच्या विकेटनंतरही आम्ही जो कमबॅक केला, त्यामुळे आम्हाला आनंद वाटला. कालच्या चुकीनंतर मी आज सकाळी उठलो आणि गुगलवरून Believe म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवण्याचा फोटो डाऊनलोड केला आणि तो मोबाईलच्या वॉलपेपरवर लावून मनाशी ठरवलं की मी हे नक्कीच करू शकतो. आमचा आमच्या संघावर विश्वास होता. त्यामुळेच आम्ही सामना जिंकलो. आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे," असे सिराज म्हणाला.