लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये पहिला दिवस हा गोलंदाजांनी गाजवला. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील कगिसो रबाडाने एकट्याने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत धाडला. त्याला मार्को यान्सेन, मार्करम आणि केशव महाराज यांनी उत्तम साथ दिली अन् ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांत आटोपला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ऑस्ट्रेलियाचा पलटवार
पहिल्या डावातील फलंदाजांची उणीव भरून काढण्यासाठी मग ऑस्ट्रेलियाने गोलंदाजी वेळी कडक रिप्लाय देत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अगदी खिंडीत पकडले. यात मिचेल स्टार्क आघाडीवर होता. पहिल्याच षटकात त्याने एडन मार्करमची शिकार केली. सलामीवीर रायल रिकल्टनलाही त्यानेच तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवसाअखेर पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४३ धावा अशी केल्याचे पाहायला मिळाले.
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
मोहम्मद शमीचा रेकॉर्ड मोडत मिचेल स्टार्कनं रचला नवा इतिहास
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या WTC फायनलमध्ये दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा करताच मिचेल स्टार्कनं खास विक्रम आपल्या नावे केला. आता तो आयसीसीच्या फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील कामगिरीसह त्याच्या खात्यात आयसीसीच्या फायनलमध्ये ६ डावात ११ विकेट्स जमा झाल्या आहेत. याआधी हा विक्रम भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या नावे होता. त्याच्या खात्यात आयसीसीच्या फायनलमध्ये ६ डावात १० विकेट्स जमा आहेत.
स्टार्कनं टीम इंडियाविरुद्धच घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
मिचेल स्टार्कनं २०१५ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलमध्ये २ विकेट्स घेतल्या होत्या. २०२३ मध्ये त्याने टीम इंडियाविरुद्धच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ४ विकेट्स आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ३ विकेट्स घेतल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या WTC फायनलमध्ये २ विकेट्स घेत तो आता आयसीसीच्या फायनल सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजाच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टीम इंडियाचा मोठा हातभार असल्याचे दिसून येते. कारण आयसीसीच्या फायनलमध्ये ११ पैकी ७ विकेट्स त्याने टीम इंडियाविरुद्ध घेतल्या आहेत.