Join us

IND vs BAN : टीम इंडिया सावधान! बांगलादेश संघाकडून हा मोठा धोका; जाणून घ्या सविस्तर

बांगलादेशनं उलथापालथ केली तर टीम इंडिया गोत्यातही येऊ शकते. ते कसं तेच आपण जाणून घेऊयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 17:42 IST

Open in App

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत भारतीय संघाचे पारडे जड आहे. जर टीम इंडियाने बांगलादेशला २-० असे क्लीन स्वीप केले तर WTC फायनलचा मार्ग अधिक सुकर होईल. याउलट बांगलादेशनं उलथापालथ केली तर टीम इंडिया गोत्यातही येऊ शकते. ते कसं तेच आपण जाणून घेऊयात

टीम इंडियाचं अव्वलस्थानच येऊ शकतं धोक्यात

कसोटीत भारतीय संघ हा नेहमीच बांगलादेशवर भारी पडला आहे. बांगलादेशच्या संघानं आतापर्यंतच्या इतिहासात भारताविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. पण जर चुकूनही बांगलादेशच्या संघाने दोन सामन्यांच्या मालिकेतील एखादा सामना जिंकला तर टीम इंडियाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतील अव्वल स्थानच धोक्यात येऊ शकते.  

बांगलादेशच्या संघानं डाव साधला तर त्याचा कांगारुंना होईल फायदा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये भारतीय संघ सध्या ६८.५२ टक्के विनिंग पर्सेंटेजसह अव्वलस्थानी आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० टक्के विनिंग पर्सेंटेजसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर भारतीय संघाने मायदेशात एखादा सामना गमावला तर विनिंग पर्सेटेजवर त्याचा विपरित परिणाम होईल. ज्याचा कांगारुंना फायदा मिळू शकतो.

या परिस्थितीत टीम इंडियाच्या अव्वलस्थानाला लागेल धक्का

जर भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची मालिका ०-१ अशी गमावली तर भारताच्या खात्यातील विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ५९ वर पोहचेल. यापुढे जाऊन पाहुण्या संघाने टीम इंडियाला ०-२ अशी मात दिली तर विनिंग पर्सेंटेज ५६ वर येईल. आकड्यांचा खेळ टीम इंडियासाठी धोक्याची घंटा वाजवणारा असला तरी हे होणं एवढं सोपं नाही. कारण २१०२ नंतर भारतीय संघानं घरच्या मैदानात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 

कसोटी मालिकेतील दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर काय?

 जर या मालिकेतील दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर त्याचाही टीम इंडियाला फटका बसू शकतो. या परिस्थितीत भारतीय संघाच्या विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ६२.१२ वर पोहचू शकतो.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीबांगलादेश