Join us

सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...

सौरव गांगुलीचा सल्ला अन् स्टार खेळाडूने रणजी सामना खेळण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 15:53 IST

Open in App

Wriddhiman Saha Retirement Decision Change : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू वृद्धिमान साहाने चार दिवसांपूर्वी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. मात्र, आता त्याने अचानक निर्णय बदलला असून, माजी खेळाडू सौरव गांगुलीच्या सांगण्यावरुन अखेरचा रणजी सामना खेळणार असल्याचे त्याने सांगितले आहे. साहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले की, त्याचा अखेरचा हंगाम हा २०२४-२५ असेल आणि तो बंगालकडून खेळताना दिसेल. गांगुली बंगालच्या संघाचा माजी कर्णधार आहे.

ESPNcricinfo शी बोलताना साहाने सांगितले की, मी यावर्षी खेळणार नव्हतो, पण सौरव गांगुली आणि माझ्या पत्नीने त्रिपुराकडून दोन हंगाम खेळल्यानंतर बंगालकडून खेळून निरोप घे असा सल्ला दिला. खरे तर साहा खेळण्यास तयार झाला असला तरी त्याने स्पष्ट केले की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केवळ लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सहभाग घेईल. तो आयपीएलमध्येही खेळणार नसून, याची माहिती त्याने गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीला दिली आहे. बंगालच्या संघाने पात्रता फेरी गाठली तर तो अखेरपर्यंत खेळेल. अन्यथा त्याची कारकीर्द कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर समाप्त होईल.

दरम्यान, वृद्धिमान साहाने आयपीएलमध्ये पाच फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. आयपीएलमधील १७० सामन्यांत त्याने २९३४ धावा केल्या आहेत. साहा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. आताच्या घडीला तो या संघाकडून रणजी स्पर्धेत मैदानात आहे.

४० कसोटी सामन्यांत वृद्धिमान साहाने २९.४१ च्या सरासरीने  १३५३ धावा केल्या आहेत. ११७ ही  त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. वन डेत तो आपली छाप सोडण्यात कमी पडला. ९ वन डेत त्याच्या खात्यात फक्त ४१ धावांची नोंद आहे. ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएलच्या माध्यमातून त्याने क्रिकेटच्या छोट्या प्रकारात मोठी कामगिरी करून दाखवली आहे. 

टॅग्स :वृद्धिमान साहासौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघ