Harmanpreet Kaur, WPL 2026: महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2026) सहाव्या सामन्यात चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (MI) आपला दबदबा कायम राखत गुजरात जायंट्सचा (GG) ७ गडी राखून पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने सलग दुसरा विजय नोंदवला. सलग दोन विजयानंतर गुजरात जायंट्सला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.
गुजरात जायंट्सची दमदार फलंदाजी
डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १९२ धावांचा डोंगर उभा केला होता. गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या आयुषी सोनीला 'रिटायर्ड आऊट' करण्याची रणनीती वापरल्यानंतर भारती फूलमाली (१५ चेंडूत ३६ धावा) आणि जॉर्जिया वेअरहॅम (४३* धावा) यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली.
मुंबई इंडियन्सची हरमनप्रीत चमकली
१९३ धावांचे मोठे लक्ष्य गाठताना मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर यास्तिका भाटिया आणि नेट सायव्हर-ब्रंट यांनी विजयाचा पाया रचला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर हिने खऱ्या अर्थाने सामन्याचे पारडे फिरवले.हरमनप्रीतने केवळ ४३ चेंडूंमध्ये शानदार अर्धशतक झळकावत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तिच्या या आक्रमक खेळीमुळे मुंबईने मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सहज केला आणि विजय मिळवला. हरमनप्रीतला इतर फलंदाजांनीही मोलाची साथ दिली.
मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील तिसऱ्या सामन्यातील दुसरा विजय आहे. गुजरात जायंट्सचा हा या मोसमातील पहिलाच पराभव ठरला. या सामन्यात डब्ल्यूपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 'रिटायर्ड आऊट' (आयुषी सोनी) ही घटना घडली. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली असून, कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म संघासाठी अत्यंत सकारात्मक बाब ठरली.