Delhi Capitals Women vs Gujarat Giants Women, 4th Match : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील चौथा सामना अतिशय रंगतदार झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना ४२ चेंडूत ९५ धावा कुटणाऱ्या सोफी डिव्हाईन हिने अखेरच्या षटकात ७ धावांचा बचाव करत दिल्ली कॅपिटल्सला रोखत गुरातच्या संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अष्टपैलू खेळीच्या जोरावर ती प्लेयर ऑफ द मॅचही ठरली. पण खरा सामना फिरवला तो अनुष्का शर्मानं. या सामन्यात नेमकं काय घडलं? जेमिमा रॉड्रिग्जचा संघ कुठं फसला? जाणून घेऊयात सविस्तर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
GG च्या संघाकडून सोफीसह अॅश्ले गार्डनरची धमाकेदार इनिंग
नवी मुंबईच्या डी. वाय पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातच्या संघाकडून सोफी डिव्हाइन हिची वादळी खेळी पाहायला मिळाली. तिने ४२ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने २२६.१९ च्या स्ट्राईक रेटनं ९५ धावा केल्या. याशिवाय कर्णधार अॅश्ले गार्डनर हिने २६ चेंडूत केलेल्या ४९ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने निर्धारित २० षटकात सर्वबाद २०९ धावा करत जेमिमा रॉड्रिग्जच्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर २१० धावांचे टार्गेट सेट केले होते.
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
लेझी लीसह लॉराचा कडक रिप्लाय, पण...
या धावांचा पाठलाग करताना शेफाली वर्मा १४ धावांवर बाद झाली. पण सलामीवीर लेझी ली हिने ५४ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांसह ८६ धावा करत संघाच्या विजयाची आस निर्माण केली. तिच्या दमदार खेळीनंतर वनडे वर्ल्ड कप गाजवणारी लॉरा वॉल्व्हार्डची बॅटही तळपली. तिने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं ७७ धावांची खेळी केली. तिने दिल्लीच्या संघाला विजयाच्या अगदी जवळ नेले, पण मोक्याच्या क्षणी तिने आपली विकेट गमावली. DC ची कर्णधार जेमिमानेही संघाची साथ सोडली अन् शेवटच्या षटकात ७ धावांचा बचावर करत सोफीनं गुजरातला विजय मिळवून देत मैफील लुटली.
फ्लाइंग अनुष्का शर्माच्या फिल्डिंगमुळे फिरली मॅच
सोफी डिव्हाइन हिने अखेरच्या षटकात जेमिमा आणि लॉराची विकेट घेत हातून निसटलेल्या सामन्यात गुजरातला परत आणले खरं, पण त्याआधी अनुष्का शर्मानं सीमारेषेवर फिल्डिंगचा जो खास नजारा पेश केला तो मॅचचा एक टर्निंग पॉइंटच होता. गुजरातच्या संघाकडून १९ वे षटक घेऊन आलेल्या काश्वी गौतम हिने दोन नो बॉलसह २२ धावा खर्च केल्या. या षटकात सामना दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं फिरला होता. पण याच षटकात अनुष्काने संघासाठी ४ धावा वाचवल्या. नो बॉलवर जेमिमा रॉड्रिग्स हिने चेंडू जवळपास सहा धावांसाठी मारला होता. पण अनुष्का शर्मानं हवेत झेप घेत षटकार रोखला. इथं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला नो बॉलच्या अवांतर धावेसह फक्त दोन धावा मिळाल्या. अनुष्काने ज्या धावा वाचवल्या अगदी तेवढ्याच धावांनी गुजरातच्या संघाने हा सामना जिंकला. त्यामुळे हा मॅचचा एक टर्निंग पाइंटच होता.