भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघाला खास मेसेज दिला आहे. गत चॅम्पियन आरसीबी संघ महिला प्रीमिअर लीग (WPL) च्या सलामी लढतीत गुजरात जाएंट्स विरुद्धच्या लढतीनं तिसऱ्या हंगामाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या हंगामासाठी किंग कोहलीनं संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डब्ल्यूपीएल गत चॅम्पियन आहे RCB
आरसीबीच्या पुरुष संघाला १७ हंगामात जे जमलं नाही ते स्मृती मानधनाच्या महिला ब्रिगेडनं दुसऱ्याच हंगामात साध्य केले. आरसीबीच्या संघानं WPL च्या गत हंगामात फायनल जिंकत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होते. यावेळी संघ ही ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सलामीच्या लढतीआधी आरसीबी फ्रँचायझीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करण्यात आलीये. यात विराट कोहली स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील महिला ब्रिगेडला बिनधास्त खेळण्याचा सल्ला देताना दिसून येते.
कोहलीचा खास संदेश; म्हणाला....
RCB च्या संघानं कोहलीचा जो व्हिडि शेअर केल्या त्यात स्टार बॅटर म्हणतोय की, WPL च्या आगामी हंगामासाठी मी संघाला खूप खूप शुभेच्छा देतो. मागच्या हंगामात तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. यावेळी तुम्ही तेच सातत्य कायम राखत आत्मविश्वासाने मैदानात उतराल, अशी आशा आहे. संघात प्रतिभावंत खेळाडूंची कमी नाही. गत हंगामात आपण ते पाहायलाही मिळाले. बिनधास्त खेळा. अशा आशयाच्या शब्दांसह कोहलीनं ट्रॉफी आपल्याकडे कायम ठेवा, असा सल्ला स्मृतीच्या महिला ब्रिगेडला दिला आहे.