WPL 2025, GG vs RCB 200 Totals Record In Women’s Premier League : महिला प्रीमिअर लीग २०२५ च्या तिसऱ्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात २०० पारची लढाई रंगल्याचे पाहायला मिळाले. गुजरात जाएंट्सची कर्णधार ॲशली गार्डनर (Ashleigh Gardner) हिने ३७ चेंडूतील तुफान फटकेबाजीसह ७९ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या धावफलकावर २०१ धावा लावल्या. ॲशली गार्डनर हिने आपल्या या इनिंगमध्ये षटकारांची हॅटट्रिक मारल्याचेही पाहायला मिळाले. तिने आपल्या भात्यातून ४ चौकार आणि त्याच्या दुप्पट म्हणजे ८ षटकार खेचले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
याआधी एकाच हंगामात तीन संघांनी चार वेळा झळकावले होते द्विशतक
महिला प्रीमिअर लीगच्या आतापर्यंतच्या हंगामात पाचव्यांदा एखाद्या संघानं धावफलकावर २०० धावा उभारल्याचे पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे याआधी एकाच हंगामात ४ वेळा असा सीन पाहायला मिळाला होता. २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं दोन वेळा तर गुजरात जाएंट्स आणि मुंबई इंडियन्स संघाने एकदा २०० धावा केल्या होत्या. त्यात आता गुजरातच्या संघानं दुसऱ्यांदा या लीगमध्ये द्विशतक झळकवण्याचा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.
महिला प्रीमिअर लीगमध्ये सर्वोच्च धावसंख्या
महिला प्रीमिअर लीगच्या इतिहासात पहिल्यांदा द्विशतक झळकवण्याचा विक्रम हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या नावे आहे. ४ मार्च २०२३ रोजी गुजरात जाएंट्स विरुद्ध रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २०१७ धावा केल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी हा विक्रम दिल्लीच्या संघानं मोडीत काढाल. ५ मार्च २०२३ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात २३२ धावा केल्या होत्या. ही या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे.
गुजरातने दोन्ही वेळा बंगळुरु विरुद्धच झळकावले द्विशतक
त्यानंतर ७ मार्च २०२३ रोजी यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २११ धावा कुटल्या होत्या. गुजरात जाएंट्सच्या संघानं २०२३ च्या हंगामत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या संघाविरुद्धच २०१ धावा केल्या होत्या. आता पुन्हा याच संघा विरुद्ध गुजरातच्या संघानं पुन्हा तेवठ्याच धावा केल्या आहेत. फरक फक्त एवढाच की. त्यावेळी गुजरातच्या संघानं ७ विकेट गमावल्या होत्या. यावेळी ५ विकेट्सच्या मोबदल्यात त्यांनी द्विशतकी डाव साधलाय.