WPL 2023, MI vs RCB : महिला प्रीमिअर लीगच्या २०२३ आजचा सामना चाहत्यांसाठी खास आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर या निर्णयाने आनंदी झाली आणि तिच्या गोलंदाजांनी मोहिम फत्ते करून दाखवली.
स्मृती व सोफी डिव्हाईन यांनी चांगली सुरुवात करून देताना ४.२ षटकांत फलकावर ३९ धावा चढवल्याय. पण, त्यानंतर हरमनप्रीतने फिरकी गोलंदाजांना मैदानावर आणले आणि ४ धावांत ४ विकेट्स पडल्या. पहिल्या सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या साइका इसाकने RCBला पहिला धक्का दिला. सोफी १६ धावांवर झेलबाद झाली. त्याच षटकात एक चेंडू सोडून दिशा कसत (०) हिचा त्रिफळा उडवला. हिली मॅथ्यूजने पुढील षटकात सलग दोन धक्के दिले. स्मृती २३ धावांवर झेलबाद झाली आणि पुढच्याच चेंडूवर हिदर नाइटचा त्रिफळा उडवला. बिनबाद ३९ वरून RCBची अवस्था ४ बाद ४३ अशी झाली.
रिचा घोष व पेरी ही जोडी RCBचा डाव सावरताना दिसली अन् त्यांना दोन वेळा रन आऊट करण्याची संधी MI ने गमावलेली. त्यात नॅट शिव्हर-ब्रंटच्या बाऊंसरवर रिचासाठी झेलची जोरदार अपील झाले. DRS घेतला गेला अन् त्यात बॅट व बॉलच संपर्क झाल्याचे दिसत होते, परंतु Ultra Edge मध्ये तसे काहीच दिसले नाही आणि रिचाला जीवदान मिळाले. कर्णधार हरमनप्रीत थोडी नाराज दिसली. मात्र. पुढच्याच षटकात पेरी ( १३) धावांवर रन आऊट झाली. ७१ वर ५ वी विकेट पडली.
कनिका अहुजाने अनपेक्षित फटकेबाजी करून RCBच्या धावांची गती वाढवली. रिचा व कनिका यांची जोडी तोडण्यासाठी पूजा वस्त्राकरला गोलंदाजीला आणले आणि तिने विश्वास सार्थ ठरवला. कनिका १३ चेंडूंत २२ धावांवर झेलबाद झाली. मॅथ्यूज पुन्हा गोलंदाजीला आली अन् तिने रिचाला २८ धावांवर झेल देण्यास भाग पाडले. श्रेयांका पाटील आणि मेगन शूट यांनी अखेरच्या षटकात सुरेख खेळ केला. या दोघींनी २० चेंडूंत ३४ धावा जोडल्या आणि शिव्हर-ब्रंटने ही जोडी तोडली. श्रेयांका १५ चेंडूंत २३ धावांवर माघारी परतली. एलेनिया केरने २ विकेट्स घेत RCBचा डाव १५५ धावांवर गुंडाळला.