Join us

IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...

World Cup 2025 Final: भारत आणि द.आफ्रिकेत उद्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी महत्त्वाच्या आकड्यांवर एक नजर टाकुयात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 19:16 IST

Open in App

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि लॉरा वोल्वार्ड्टच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहेत. भारताने उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून इतिहास रचला, तर आफ्रिकेने इंग्लंडला धूळ चारून पहिल्यांदाच अंतिम फेरीत स्थान मिळवले. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.

द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत भारताचा दबदबा

महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आतापर्यंत एकूण ३४ वेळा एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यातील भारताने एकूण २० सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १३ सामन्यात विजय मिळवता आला आहे. शिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे. या आकडेवारीवरून, द्विपक्षीय मालिकांमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर नेहमीच वर्चस्व राखले आहे, हे स्पष्ट होते.

वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व पाहायला मिळत असले तरी विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये नेहमीच कांटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ एकूण ६ वेळा आमने-सामने आले. यातील तीन सामने भारताने आणि तितकेच सामने दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकले आहेत. आकडेवारीनुसार, विश्वचषकात दोन्ही संघ बरोबरीत आहेत. यामुळेच अंतिम सामन्यात कोण बाजी मारेल? याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.

फायनल सामन्याकडे सर्वांचे लक्ष

यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध खेळले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतावर ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला होता. हा विजय आफ्रिकेचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारा आहे. भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार केली, पण मधल्या टप्प्यात सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. मात्र, महत्त्वाच्या वेळी न्यूझीलंड आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेले मोठे विजय टीम इंडियाचा फॉर्म आणि आत्मविश्वास दर्शवतात. आता हा ऐतिहासिक रेकॉर्ड कायम ठेवत भारतीय महिला संघ विश्वचषक उंचावतो का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरनमप्रीत कौर