लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या तीन क्रिकेटपटूंना प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांचे तर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस राज्य सरकारने दिले आहे. आता भारतीय संघाने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
या तिन्ही खेळाडू आणि अमोल मुजुमदार यांचा सत्कार शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीसांचे धनादेशही यावेळी देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, यांच्यासह प्रधान सचिव संजय खंडारे, क्रीडा आयुक्त शीतल तेली आदी उपस्थित होते.
समर्पण, जिद्द, चिकाटीचे कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाने दाखविलेले समर्पण, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले. संपूर्ण देशाला आपला अभिमान आहे असे ते म्हणाले.
सपोर्ट स्टाफचाही सन्मान
गोलंदाज प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडलजी, ॲनलिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिररुल्ला यांचाही सत्कार करण्यात आला. सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.