WPL 2025 Auction, WPL 2025 मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने १६ वर्षीय युवा महिला खेळाडूसाठी पर्समधून मोठी रक्कम काढल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरुच्या मिनी लिलावात जी कमलिनी या तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळाली. झुलन गोस्वामीसह नीता अंबानी या देखील ऑक्शन टेबलवर उपस्थितीत होत्या. अखेर नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघानं १ कोटी ६० लाख रूपये बोलीसह जी कमलिनी हिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. १० लाख मूळ किंमत असलेल्या युवा महिला क्रिकेटवर मिनी लिलावात मेगा बोली लागली.
कोण आहे कमलिनी? (Who is G Kamalini?) जी. कमलिनी ही भारतातील एक उदयोन्मुख खेळाडू आहे. २० जुलै २००८ मध्ये जन्मलेल्या या १६ वर्षीय मुलीनं देशांतर्गत आणि आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवून लक्षवेधून घेतल आहे. ती विकेट किपर बॅटर असून डावखुरा हाताने स्फोटक फलंदाजी करण्यात माहिर आहे. ती लेगब्रेक गोलंदाजीही करु शकते.
तामिळनाडूच्या छोरीनं टी-२० क्रिकेटमध्ये सोडली होती खास छाप
२०२३ मध्ये कमलिनी हिने राष्ट्रीय स्तरावरील दमदार कामगिरीसह सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. तामिळनाडूच्या या युवा मुलीनं U-19 T20 ट्रॉफी स्पर्धेत ८ सामन्यात ३११ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या स्पर्धेतील कामगिरीनं ती चर्चेत आली. आता ती अंडर १९ गटातील भारतीय महिला संघाची प्रमुख सदस्य आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत जी. कमलिनीती कमाल; अन्...
१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत जी. कमलिनी ही भारतीय संघाचा भाग आहे. बंगळुरुमध्ये मिनी लिलाव सुरु असताना कमलिनीनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात धमाकेदार बॅटिंग करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही पाहायला मिळाले. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिने २९ चेंडूत ४४ धावांची खेळी करत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कारही पटकावला. एका बाजूला भारतीय संघासाठी धमाकेदार कामगिरी केली असताना दुसऱ्या बाजूला मिनी लिलावात मुंबई इंडियन्स आणि या संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी १ कोटी ६० लाख रूपये एवढी मोठी रक्कम पर्समधून काढली.