Join us

'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली; स्मृतीच्या आरसीबीचा धुव्वा उडवत दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

प्ले ऑफ्समध्ये एन्ट्री मारणारा पहिला संघ ठरला दिल्ली कॅपिटल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 23:18 IST

Open in App

महिला प्रीमिअर लीगच्या २०२५ च्या हंगामातील १४ व्या लढतीत टीम इंडियाबाहेर असलेल्या 'लेडी सेहवाग'च्या म्हणजेच शफाली वर्माच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं यंदा महिला आयपीएलचं तख्त राखण्यासाठी प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महिला संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना एलिस पेरी ६०(४७) च्या अर्धशतकाशिवाय राघवी बिष्टनं केलेल्या ३२ चेंडूतील ३३ धावांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १४७ धावा करत दिल्ली कॅपिटल्स महिला संघासमोर १४८ धावाचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघातील सलामीची बॅटर शफाली वर्माची बॅट तळपली अन् आरबीवर पराभवाची नामुष्की ओढावली.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्ली कॅपिटल्सनं पहिली विकेट स्वस्तात गमावली, पण मग शफाली-जेस दोघी पुरून उरल्या

आरसीबीच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. कॅप्टन मेग लेनिंग २ षटके खेळून फक्त २ धावा करून तंबूत परतली. २.४ षटकात धावफलकावर फक्त ५ धावा असताना  दिल्ली कॅपिटल्स संघानं आपली पहिली विकेट गमावली होती. त्यामुळे या सामन्यात स्मृती मानधनाचा गत चॅम्पियन आरसीबी संघ दिल्ली कॅपिटल्सला धावांचा पाठलाग करताना दमवणार, असे चित्र निर्माण झाले होते. पण शफाली वर्मानं टॉप गियर टाकला तिला जेस जोनासनची साथ मिळाली अन् दोघींनीच १६ व्या षटकात ९ विकेट्स राखून मॅच संपवली.

लेडी सेहवागसह जेसीचा धमाका, दिल्ली कॅपिटल्सची प्ले ऑफमध्ये एन्ट्री

यंदाच्या तिसऱ्या हंगामात आरसीबी विरुद्धची लढाई जिंकत दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं प्ले ऑफ्समध्ये एन्ट्री मारली आहे. महिला प्रीमिअर लीगममध्ये प्ले ऑफ्समधील स्थान पक्के करणारा दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यात शफाली वर्मानं  ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकाराच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. जर आणखी टार्गेट असते तर शफालीनं अगदी सहज शतक पूर्ण केले असते. पण टार्गेटच तोकडे असल्यामुळे मोठा डाव साधण्याची तिची संधी हुकली. पण या खेळीसह महिला प्रीमिअर लीगमध्ये पहिलं शतक लवकर येईल, याचे संकेत तिने दिले आहेत. तिच्याशिवाय डेस जोनेसन हिने ३८ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेटरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरस्मृती मानधनादिल्ली कॅपिटल्सशेफाली वर्मा