BCCI IPL 2025 after Operation Sindoor: काश्मीरच्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला ( Pahalgam Terror Attack ) झाला. त्यात २६ निष्पाप हिंदूंची हत्या करण्यात आली. याचा बदला म्हणून मंगळवारी रात्री दीडच्या भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या मार्फत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. तिन्ही सैन्यदलांनी मिळून संयुक्तपण केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या ४ आणि पीओकेमधी ५ दहशतवादी तळांना एकाचवेळी टार्गेट करण्यात आले. या हल्ल्याची अधिकृत माहिती भारत सरकारच्या सैन्यदलाने दिली. तसेच, या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानकडून आणखी दहशतवादी हल्ले घडवून आणले जाऊ शकतात, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांनाच अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या हल्ल्याचा IPL च्या सध्या सुरु असलेल्या हंगामावर काही परिणाम होईल का? याबाबत BCCI ने माहिती दिली.
IPLच्या वेळापत्रकात बदल होणार?
ऑपरेशन सिंदूरमध्ये घडलेल्या घडामोडी आणि त्यानंतर होऊ शकणाऱ्या घडामोडींचा सध्या भारतात सुरू असलेल्या IPL 2025 स्पर्धेवर काही परिणाम होईल का, असा सवाल अनेकांना पडला असेल. त्यावर बीसीसीआयकडून सांगण्यात आले. बीसीसीआयच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, IPL मध्ये आता जे सुरु आहे ते तसंच कायम राहिल. सामन्यांच्या वेळापत्रकात थोडाही परिणाम किंवा बदल होणार नाही. IPLच्या या हंगामातील सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्व सुरक्षेच्या बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
बांगलादेशचा पाकिस्तान दौरा रद्द होण्याची शक्यता
लवकरच बांगलादेश क्रिकेट संघही पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यांची पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जाईल. ही मालिका येत्या २५ तारखेपासून खेळली जाणार आहे. पाकिस्तानमध्ये पीएसएलचा दहावा हंगाम खेळला जात आहे. या लीगमधील अजूनही बरेच सामने बाकी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशचे बरेचसे खेळाडू पाकिस्तानात PSL खेळत आहेत. बांगलादेशचे दोनच खेळाडू बांगलादेशात आहेत. त्यानंतर संपूर्ण बांग्लादेश क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार आहे. पण वाढता तणाव पाहता ही मालिका रद्द होण्याची शक्यता आहे.