नवी दिल्ली - अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राष्ट्रीय निवड समितीसोबत घेतलेला पंगा भोवण्याची शक्यता आहे. कारण, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या विरोधात शमीने माध्यमांमध्ये जाहीर वक्तव्य केल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली.
शमी विरुद्ध आगरकर वाद
मोहम्मद शमीने फिटनेसची माहिती आम्हाला दिलेली नाही. त्यामुळे संघ निवडीवेळी त्याचा विचार झाला नाही, अशा आशयाचे वक्तव्य आगरकर यांनी केले होते. यावर उत्तर देताना शमी म्हणाला, ‘अपडेट देण्याबद्दल बोलायचे झाल्यास, अपडेट देणे किंवा अपडेट विचारणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या तंदुरुस्तीबद्दल माहिती देणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे हे आहे. त्यांना कोण अपडेट देतो आणि कोणी दिले नाही, ही त्यांची बाब आहे. ही माझी जबाबदारी नाही.’ यावर विचारले असता, आगरकर यांनी स्पष्ट केले की, ‘शमी भारताकडून शेवटचा खेळल्यापासून अनेक वेळा त्याच्यासोबत संपर्क साधण्यात आला. मात्र, सीओईमधील वैद्यकीय पथकाला वाटत नाही की शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कठोर आव्हानांसाठी तयार आहे.’ आगरकर यांच्या या वक्तव्याने शमी नाराज झाला आणि त्याने उत्तर दिले, ‘त्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या.’ त्यानंतर बीसीसीआयने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्य विभागातून नव्याने नियुक्त झालेले निवडकर्ता आर. पी. सिंग यांना कोलकाता येथे पाठवले आणि त्यानंतर शमीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. परंतु, हे प्रकरण कदाचित हाताबाहेर
गेले आहे.
एका वरिष्ठ बोर्ड अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले, ‘राष्ट्रीय निवडकर्त्यांनी आणि बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समधील (सीओई) सपोर्ट स्टाफने शमीची विचारपूस करण्यासाठी अनेक वेळा फोन केले आहेत. जसप्रीत बुमराह तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकणार नसल्यामुळे निवड समिती इंग्लंडमध्ये त्याची सेवा घेण्यासाठी उत्सुक होती. इंग्लिश परिस्थितीत त्याच्या क्षमतेचा गोलंदाज कोणाला नको असेल?’
सौरव गांगुलीचा शमीला पाठिंबा
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोहम्मद शमीचे सर्व प्रकारांसाठी भारतीय संघात पुनरागमन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. हा कुशल वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे, असा विश्वास देखील गांगुलीने व्यक्त केला. गांगुली म्हणाला, “शमी अतिशय चांगली गोलंदाजी करत आहे. तो तंदुरुस्त आहे. रणजी करंडकाच्या आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने आपल्या बळावर बंगालला विजय मिळवून दिला.”