भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आशिया चषक स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली. ही याचिका उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि लोकांच्या भावनांच्या विरुद्ध आहे, असे मत त्यांनी मांडले.
याचिकेमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, क्रिकेटला राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन किंवा सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या बलिदानापेक्षा अधिक महत्त्व दिले जाऊ शकत नाही. या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ च्या अंमलबजावणीसाठी निर्देश देण्याची देखील मागणी केली. ही याचिका वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्यामार्फत दाखल करण्यात आली.
या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा आशिया चषकातील एक महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि जनहित याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या भावनिक चिंतांमुळे आता या सामन्यावर अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. या प्रकरणाची नियोजित सामन्याच्या तारखेपूर्वी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आशिया चषक 2025: भारताची दमदार सुरूवातदरम्यान, बुधवारच्या सामन्यात भारताने यजमान युएईचा ९ विकेट्सने पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. भारताच्या डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने ७ धावांत ४ गडी बाद केले. तर, अष्टपैलू शिवम दुबेने ४ गडी बाद केले. यामुळे युएईचा संघ १३.१ षटकांत केवळ ५७ धावांवरच सर्वबाद झाला. भारताने हे लक्ष्य फक्त ४.३ षटकांत गाठले. सलामीवीर अभिषेक शर्माने १६ चेंडूत ३० धावा केल्या. शुभमन गिलने ९ चेंडूत २० धावा केल्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव ७ धावांवर नाबाद राहिला.