Why Virat Kohli Wants To Retire From Test Cricket : विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतल्याची गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरतीये. रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीच्या कसोटी निवृत्ती संदर्भातील हे वृत्त चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडणारे आहे. विराट कोहलीचा तगडा फिटनेस हा तो आणखी काही वर्षे खेळेल, याची हमी देणारा वाटाचयचा. पण छोट्या फॉर्मेटनंतर (टी-२०) आता मोठ्या फॉर्मटमध्ये (कसोटी) तो थांबणार असल्याची चर्चा आहे. कोहलीनं बीसीसीआयला कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे कळवल्यावर बीसीसीआयने त्याला पुन्हा विचार करण्यास सांगितल्याचीही चर्चा आहे. भारतीय संघाचे नेतृत्व सोडल्यावरही त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला होता. त्यामुळेच आगामी इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ त्याच्याशिवायच मैदानात उतरेल, असे चित्र निर्माण झाले आहे. इथं जाणून घेऊयात काय असू शकतात कोहली कसोटी क्रिकेटमधून थांबण्यामागची कारणं....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कसोटीत धावांसाठी संघर्ष, देशांतर्गत क्रिकेटमध्येही ठरला फेल
आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट तळपल्याचे पाहायला मिळाले. पण टेस्ट क्रिकेटमध्ये तो धावांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सातत्याने तो बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होताना दिसला. एकाच पॅटर्नमध्ये आउट होण्याची वेळ आल्यावर त्याच्यावर टिकाही झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहलीने एक शतक झळकावले. पण त्याआधी न्यूझीलंड दौरा त्याच्यासाठी भयावह स्वप्नासारखाच राहिला. घरच्या मैदानात न्यूझीलंड दौऱ्यातील तीन सामन्यात तो शंभरचाही आकडा गाठू शकला नव्हता. या मालिकेत त्याने १५.५० च्या सरासरीने फक्त ९३ धावा केल्या होत्या. एवढेच काय तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला आपली छाप सोडता आली नव्हती.
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
५ वर्षांत फक्त ३ शतके
२०११ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून विराट कोहलीनं या क्रिकेट प्रकारात अधिराज्य गाजवलं. २०१९ पर्यंत त्याने कसोटीत ५४.९७ च्या सरासरीने धावा केल्या. यात २७ शतकांचा समावेश आहे. या कालावधीत फॅब-फोरमधील जो रूट, केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यापेक्षा त्याच्या खात्यात अधिक शतके जमा होती. पण २०२० पासून त्याची कसोटीतील कामगिरी घसरण झाली. १ जानेवारी २०२० पासून ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत ३९ कसोटी सामन्यात त्याने ३०.७२ च्या सरासरीने २०२८ धावा केल्या आहेत. शतकी रोमान्स करणाऱ्या हिरोनं पाच वर्षांत फक्त तीन शतके झळकावली आहेत. या आकडेवारीमुळेच तो निवृत्तीचा विचार करतोय का? असा प्रश्न पडू शकतो. पण "फॉर्म इज टेम्पररी अँण्ड क्लास इज परमनंट" या आधारे तो आणखी काही काळ टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकतो.
कौटुंबिक जबाबदारीसह अन् वनडे वर्ल्ड कपवरील फोकस
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून थाबण्यांचा विचार करण्यामागे फॅमिली हे देखील एक कारण असू शकते. टी-२० क्रिकेट पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन तो कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्याच्या विचारातही असू शकतो. याशिवाय २०२७ वनडे वर्ल्ड कपची तयारी हे देखील त्याच्या मोठ्या निर्णयामागचे कारण असू शकते.