Who is Aaron George : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान याच्यातील सामना दुबईच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात युवा बॅटर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे स्वस्तात माघारी फिरले. संघ अडचणीत असताना एरोन जॉर्ज (Aaron George) याने संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याचं शतक हुकले, पण ८५ धावांच्या खेळीसह त्याने पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडले. कोण आहे एरोन जॉर्ज? जो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी संकटमोचक होऊन चर्चेत आलेला चेहरा? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघ अडचणीत असताना तो तग धरुन मैदानात थांबला अन्....
आशिया कप स्पर्धेतील सलामीच्या लढत विक्रमी शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी अवघ्या पाच धावा करून बाद झाला. कर्णधार आयुष म्हात्रेनं ३८ धावांवर तंबूचा रस्ता धरला. पहिल्या २ विकेट्स घेत पाकिस्तानच्या संघाने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले असताना एरोन जॉर्ज याने तंत्रशुद्ध फलंदाजीचा नजराणा पेश करताना १२ चौकार आणि एका षटकराच्या मदतीने ८५ धावांची खेळी करत टीम इंडियाला मॅचमध्ये आणले.
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
कोण आहे एरोन जॉर्ज?
एरोन जॉर्ज याचा जन्म केरळमध्ये झाला. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हैदराबादच्या संघाकडून खेळतो. विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत त्याने आपल्या कॅप्टन्सीत हैदराबाद संघाला जेतेपद मिळवून दिले आहे. या जेतेपदासह ३८ वर्षानी हैदराबादच्या संघाने देशांतर्गत स्पर्धा गाजवत इतिहास रचला होता. एरोन जॉर्ज याने विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेतील मागील दोन हंगामात ३४१ आणि ३७३ धावा करत अंडर १९ क्रिकेटमध्ये आपली खास छाप सोडली आहे. एरोन जॉर्ज याने २०२२-२३ च्या विजय मर्चेंट ट्रॉफी स्पर्धेत बिहार विरुद्धच्या सामन्यात नाबाद ३०३ धावांची लक्षवेधी खेळी केली होती.
वडिलांच स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं टाकतोय पावलं
एरोन जॉर्ज याचे वडील ईसो वर्गीस यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. पोलिसात काम करण्याआधी ते वेगवेगळ्या लीगमध्ये खेळले आहेत. पण परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेटमधील प्रवास कायम ठेवता आला नाही. बापाचं स्वप्न घेऊन एरोन जॉर्ज मैदानात धमक दाखवताना दिसत आहे. क्रिकेटशिवाय एरोन जॉर्ज हा टेबल टेनिस आणि बास्केटबॉलचा छंद जोपासतो. संयमी फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियातील युवा बॅटर एबी डिविलियर्सला आपला आदर्श मानतो.