क्रिकेटला धर्म मानल्या जाणाऱ्या भारतात क्रिकेटपटूंबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये खूप कुतूहल असतं. क्रिकेटपटूंच्या खेळापासून ते त्यांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत सर्व बाबींवर क्रिकेटप्रेमींची बारीक लक्ष असतं. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या लव्हस्टोरी, अफेअर्स आणि ब्रेकअप चवीने चर्चिल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला ज्या एका क्रिकेटपटूच्या लव्हस्टोरीची माहिती देणार आहोत. ती लव्हस्टोरी तुम्ही याआधी कधी ऐकली असण्याची शक्यता फारच कमी आहे. स्टेट बँकेच्या शाखेत चलन बदलत असनाता सुरू झालेल्या या लव्हस्टोरीमधील भारतीय क्रिकेटपटूने आपल्या गर्लफ्रेंडसाठी चक्क देश सोडला. तसेच काही काळ बंदीचाही सामना केला. मात्र आपलं प्रेम यशस्वी करून दाखवलं.
या भारतीय क्रिकेटपटूचं नाव आहे महालिंगम व्यंकेशन. व्यंकटेशन यांनी आपल्या प्रेमासाठी जे काही केलं त्यासमोर बॉलिवूडच्या अनेक रोमँटिक चित्रपट फिके पडतील अशी आहे. १९७० आणि ८० च्या दशकाच्या अखेरीपर्यंत भारतातील प्रादेशिक आणि देशांतर्गत क्रिकेटमधाील प्रमुख नावांपैकी एक असलेल्या महालिंगम यांनी प्रेमासाठी अशी काही जोखीम पत्करली की त्यामुळे त्यांचं जीवनच बदलून गेलं.
आता महालिंगम व्यंकटेशन यांनी स्वत:च त्यांच्या लव्हस्टोरीची रंजक माहिती सांगितली आहे. ते सांगतात की, माझी पत्नी मुळची दक्षिण आफ्रिकेतील आहे. ती १९८३ मध्ये भारतात आली असताना मी तिला भेटलो. त्यानंतर काही दिवसांनी ती परत दक्षिण आफ्रिकेत गेली. मग माझं प्रेम मिळवण्यासाठी मीसुद्धा दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा मार्ग पत्करला.
व्यंकटेशन यांनी पुढे सांगितले की, तेव्हा प्रवास करणं एवढं सोपं नव्हतं. कुणीही सहजपणे दक्षिण आफ्रिकेत जाऊ शकत नव्हतं. मात्र मला भारत सरकारकडून विशेष परवानगी मिळाली आणि त्याच वर्षी मी दक्षिण आफ्रिकेत गेलो. दक्षिण आफ्रिकेत माझे एक नातेवाईक राहतात, त्यांना भेटण्यासाठी मी जात आहे, असे मी त्यांना सांगितले. त्या काळी केवळ कागदावर लिहिलेहा व्हिसा मिळत असे. दर्बानला उतरल्यानंतर मी जेव्हा प्रिसिला हिला फोन केला तेव्हा तिचा मी आफ्रिकेत आलो यावर विश्वासच बसला नाही. तू खोटं बोलत आहेस असं ती म्हणाली. आमची पहिली भेट झाली तेव्हा प्रिसिला आणि तिची बहीण बँकेत चलन बदलण्यासाठी आले होते. तेव्हा भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी सामना सुरू होता आणि मी तिला तो सामना पाहायला घेऊन गेलो. त्या दिवशी असं काही घडलं की आता आमच्या लग्नाला ३८ वर्ष झाली आहेत, असं महालिंगम म्हणाले.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर महालिंगम व्यंकटेशन यांनी तिथून क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या काळात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांवर बंदी होती. मात्र स्थानिक पातळीवर तिथे क्रिकेट सुरू होतं. तसेच दक्षिण आफ्रिकेत दोन क्रिकेट बोर्ड होते. त्यावेळी ते एका स्थानिक क्रिकेट संघामधून खेळण्यास सुरुवात केली. ते महालिंगम मुरली नावाने काही सामने खेळले. मात्र त्यांच्या व्हिसाची मुदत संपायला आल्यानंतर त्यांच्यासमोर अडचणी सुरू झाल्या. त्यांनी व्हिसासाठी मागितलेली मुदतवाद मिळाली नाही. तसेच त्यांना प्रिसिला हिला सोडून भारतात परतावे लागले.
महालिंगम व्यंकटेशन यांनी पुढे सांगितले की, पुढे दक्षिण आफ्रिकेत माझ्यावर बंदी घालण्यात आली. खरंतर चार सामन्यात मी चांगला खेळलो होतो. निवड समितीला बेन्सन अँड हेजेस स्पर्धेसाठी भेटायचं होतं. माझी निवडही झाली. मात्र त्याचवेळी मी दक्षिण आफ्रिकेतील नसल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर माझ्यावर बंदी घालण्यात आली. एनसीबीने सांगितलं की, तू खेळू शकत नाही. कारण दक्षिण आफ्रिकेबाहेरील कुठलाही खेळाडू हा वर्णभेदाचं समर्थन करतो, असं त्यांना वाटायचं. मी भारतात परतलो. मात्र दक्षिण आफ्रिकेकडून खेळणारा मी पहिला भारतीय ठरलो होतो.
त्यानंतर व्यंकटेशन यांची पत्नी १९८६ मध्ये भारतात आली. त्याचवर्षी दोघांनीही विवाह केला. पुढे दोघांनीही एकत्र संसार केला. तसेच २००० साली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर महालिंगम यांनी रेस्टॉरंटच्या व्यवसायात पदार्पण केले. ते लवकरच ३ रेस्टॉरंटचे मालक बनले.